(मुंबई)
रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करणे आणि त्यानंतर त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याची झालेली हत्या, या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. प्रदीप शर्मा यांनी जामीन अर्ज मुंबई हायकोर्टात दाखल केला होता. त्यावर बुधवार, 4 मे रोजी सुनावणी झाली. त्यावेळी एनआयएने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले गेले.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात मनसुख हिरेनच्या हत्येसाठी तब्बल 45 लाख रुपयांचा सौदा करण्यात आला होता, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले गेले आहे.
या प्रतिज्ञापत्रात एनआयएने हा हत्येचा कट पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीतच रचला होता, असेही म्हटले आहे. तसेच सचिन वाझे याने प्रदीप शर्मा यांना 45 लाख रुपये दिल्याचे म्हटले आहे.