(रत्नागिरी)
साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून महत्त्वाचा असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाशी बाजार समितीत कोकणातून ८० हजार पेटी दाखल झाली आहे. त्यात रत्नागिरीचा टक्का सर्वाधिक आहे. २६ एप्रिलनंतर महाराष्ट्रासह अन्य राज्यातून वाशीत एक लाखापेक्षा अधिक पेट्या येण्यास सुरवात झाली. आवक वाढल्यामुळे दरही हजार रुपयांपर्यंत कमी आले आहेत. सध्या वाशीत ८०० पासून ३ हजार रुपयांपर्यंत पाच ते आठ डझनच्या पेटीला आकारले जात आहेत.
गेली दोन वर्षे कोरोनमुळे अक्षय्य तृतीयेला वाशी बाजारात एप्रिल महिन्यातील हापूसची आवक तीस हजार पेटी एवढीच होती. यंदा कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर बाजारात तेजी आली असून आंबा बागायतदार सुखावले आहेत. यंदा अवकाळी पावसासह बिघडलेल्या हवामानामुळे हंगामाच्या सुरवातीला उत्पादन कमी राहीले. एक महिना उशिरा पिक हातील आले आहे. आरंभीला हापूसला सोन्याचा दर आला होता. पाच डझनची पोटी साडेपाच ते सहा हजार रुपयांनी विकली जात होती.
वाशीसारख्या मोठ्या बाजारामध्ये मार्च महिन्यात प्रतिदिनी २१ हजार पेट्याच जात होत्या. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पेट्यांची संख्या वाढली. तरीही पेटीचा दर सर्वसाधारण चार हजारापर्यंत होता. उन्हाचा कडाका वाढल्यानंतर हापूसची आवक वाशीमध्ये वाढू लागली. दर चढेच राहिल्यामुळे सर्वसामान्यांना हापूसची चव चाखायला मिळालेली नव्हती. अक्षय तृतीयेपुर्वी आठ दिवस वाशातील आवक १ लाख ओलांडून गेली. दरवर्षी मार्चच्या अखेरीस गुढीपाडव्याला लाखभर पेटी बाजारात जाते. यंदा चित्र वेगळेच होते. गेल्या दोन दिवसात ८० ते ८४ हजार पेट्या गेल्यामुळे दरातही मोठी घट आहे. सध्या पेटीचा दर ८०० रुपयांपासून ते ३ हजार रुपयांपर्यंत स्थिरावला आहे.