(रत्नागिरी)
काही दिवसापूर्वी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे संगमेश्वर तालुक्यातील एका गावातील गरिब कुटुंबातील स्त्री १४ एप्रिल रोजी पतीसोबत जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली होती.
१६ एप्रिल रोजी त्या स्त्रीने एका नवजात बाळाला जन्म दिला. त्याच दिवशी तिला रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र तेच बालक दत्तक घेण्यासाठी एक मुस्लीम दाम्पत्य शहरातील एका वकिलाकडे सल्ला मागायला गेले होते.
सामाजिक कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयातून चौकशी केली असता मुल विकण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे समोर आले. दरम्यान संघटनांनी प्रसुती झालेल्या महिलेच्या गावातील प्रमुखांशी संपर्क साधला यानंतर गावातील आणि समाजातील लोकांनी त्या महिलेला असेल त्या अवस्थेत गावात येण्याच्या सुचना केल्या. मात्र मध्यस्थी केलेली होमगार्ड महिला आपल्याला सोडत नसल्याचे या महिलेने सांगितल्यामुळे एका पदाधिकाऱ्याने काही संघटनांना एकत्रित करून या गोष्टीची माहिती दिली.
शहरातील एका लॉजवर मुस्लीम दाम्पत्य थांबले होते. मध्यस्थी केलेल्या होमगार्ड महिलेला या संघटनांनी जाब विचारला असता या महिलेने करारानुसार ठरलेल्या रकमेची मागणी केली, अशी घटना समोर आली. दरम्यान याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनेचा तपास करून 2 महिलांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला.
फैमिदा शरीफ काझी ( ५२ , रा . पावस रत्नागिरी ) व संगिता प्रकाश शिंदे ( ५१ , रा . समिश्रनगर रत्नागिरी ) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.