(रत्नागिरी)
वृत्तपत्र म्हणजे फक्त पत्रकार, संपादकीय विभाग नव्हे तर डीटीपी ऑपरेटर, जाहिरात आणि वितरण विभाग असे टीमवर्क असते. पत्रकार जनतेसमोर असतो परंतु वृत्तपत्राच्या कार्यालयातील कर्मचारी नेहमीच प्रसिद्धी, कौतुकापासून दूर असतात. या सर्वांना एकत्र आणून रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाने 50 हून अधिक जणांनी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित केले. हा स्तुत्य कार्यक्रम महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सोमवारी सकाळी गगनगिरी महाराज मठाच्या सभागृहात झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजीव कीर, पत्रकार मनोज मुळ्ये, ज्येष्ठ पत्रकार अलिमियॉं काझी, किशोर मोरे, श्रीकृष्ण देवरुखकर, अजित आंबेकर, चिपळुणचे पत्रकार योगेश बांडागळे, संघाचे संस्थापक दत्तात्रय महाडिक, अध्यक्ष मेहरून नाकाडे, सल्लागार राजेंद्र चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्ष मेहरून नाकाडे म्हणाल्या की या कौतुक सोहळ्याला वृत्तपत्रातील सर्व कर्मचारी उपस्थित राहिल्यामुळे आनंद झाला आहे.
पत्रकारांसाठी अजून नवनवीन कार्यक्रम आयोजित करावे, लागणारे सर्व सहकार्य करू, असे प्रतिपादन पत्रकार मनोज मुळ्ये यांनी केले. ते म्हणाले, पत्रकार नेहमीच जनतेच्या समोर असतात. परंतु वृत्तपत्र कार्यालयात काम करणारे अनेक कर्मचारी समोर येत नाहीत. तेसुद्धा जबाबदारी काम करत असतात. लोक त्यांना ऑपरेटर किंवा जाहिरात प्रतिनिधी म्हणून नव्हे तर वृत्तपत्राचा माणूस म्हणून ओळखतात. बातमी सजवण्याचे काम ऑपरेटर करतात. त्यांचे कौतुक केलेत हे महत्त्वाचे होते. यापूर्वी असा कार्यक्रम कधीही झालेला नाही.
पत्रकार श्रीकृष्ण देवरुखकर यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून यापुढेही असेच नवनवीन कार्यक्रम घ्यावेत, त्याकरिता मदत करू, असे सांगितले. जसे आपले अवयव आहेत, तसेच वृत्तपत्रातील वेगवेगळे विभाग महत्त्वाचे आहेत. नजरेसमोर नसणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा असे सातत्याने उपक्रम राबवावेत. त्यातून या कर्मचाऱ्यांमध्ये एकोपा निर्माण होईल. योगेश बांडागळे यांनीही वृत्तपत्रातील ऑपरेटर, जाहिरात प्रतिनिधी आणि वितरण विभागाचे महत्त्व सांगितले.
राजीव कीर म्हणाले की, पत्रकार बंधू आणि सर्व कर्मचारी समाजातील सत्य शोधण्याचे काम करत आहेत. पडद्यामागच्या कलाकारांना पुढे आणण्याचे काम रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाने केले आहे. पत्रकारांना पुरस्कार मिळतो, पण या कर्मचाऱ्यांमुळे हे पत्रकार मोठे होत असतात. सेवाभावी वृत्तीने हे पत्रकार काम करत असतात त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमाचा ओलावा आहे. संघाच्या कार्यक्रमाला मी नेहमीच मदत करेन. वृत्तपत्रातील कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.