(रत्नागिरी)
जिल्हा पोलिस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत सामाजिक बांधिलकिचे देखील दर्शन निसर्ग चक्रीवादळात घडवले; मात्र एवढ्यावरच ते थांबले नाहीत. समाजात अनेक ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी पोलीस दलाकडे आल्या असताना, अशा निराधार ज्येष्ठ नागरिकांना माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात देत त्यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी पोलिस दल पुढे सरसावले आहे. मिशन आधार या मोहिमेअंतर्गत गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील सुमारे १ हजार २७ ज्येष्ठ नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न पोलिस दलाने केल्याने ज्येष्ठ नागरिकांनी पोलिस दलाला धन्यवाद दिले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून मिशन आधार हा उपक्रम जिल्ह्यात राबवला जात आहे. विशेष म्हणजे फक्त दिखाऊपणा न करता प्रत्यक्ष भेटी घेऊन त्या ज्येष्ठ मंडळीची माणुसकीच्या नात्याने सहानूभुतीपूर्वक विचारपूस करण्यात आली. अनेक ज्येष्ठ नागरिक निराधार आहेत. काहींना कुटुंबाकडून त्रास दिला जात आहे. मुले सांभाळ करत नसल्याने काही निराधार आई-वडील आहेत. जिल्ह्यात याबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी अशा निराधार आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये निराधार ज्येष्ठांची पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून भेटीगाठी सुरू झाल्या. रत्नागिरी पोलिस या फेसबुक पेजवर प्रत्येक पोलिस ठाण्याकडून फोटो आणि माहिती प्रसिद्ध केली जाऊ लागली.
पोलिस अधीक्षकांकडून याचा आढावा घेतला जात असल्याने पोलिस दलातील अधिकार, कर्मचाऱ्यांनी माणुसकी दाखवत मनापासून हे काम केले. अनेक निराधार कुटुंबांना अधिकाऱ्यांनी मदत दिली. कायद्याच्या जोरावर अनेकांचे प्रश्न सोडवले. काहींना निराधार म्हणून शासकीय योजनांचा फायदा करून दिला. ज्या कुटुंबात ज्येष्ठांना त्रास दिला जात होता तिथे कायद्याचा धाक दाखवून ज्येष्ठांना मोठा आधार दिला. अशा प्रकारे जिल्हा पोलिसदलाच्या मिशन आधारने जिल्ह्यातील सुमारे १ हजार २७ ज्य़ेष्ठांची भेट घेऊन त्यांना मदत करत उतारत्या वयात मदतीचा हात दिला. खाकीतील या माणसाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मानवतेच्यादृष्टीने मदत
जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली निराधार ज्येष्ठ नागरिकांचा शहर परिसरात शोध घेतला. आठ ते दहा ज्येष्ठांच्या आम्ही भेटी घेतल्या. त्यांच्या काही अडचणी आम्ही सोडविल्या असून आणखी काही समस्या आल्यास त्यांना संपर्क करण्यास सांगितले आहे. मानवतेच्यादृष्टीने जी मदत करता येईल तेवढी आम्ही करत आहे.-विनित चौधरी, रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक