(चिपळूण)
मुंबई – गोवा महामार्गावरील चिपळूण – कुटरे फाटा येथे एस.टी. बसच्या मागे उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवार १ मे रोजी सकाळी ६.३० वा . च्या सुमारास घडली. तर या अपघातात २ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस चालक शशिकांत भोईनवाड ( ३३ कल्याण , ठाणे ) हे आपल्या ताब्यातील बस घेऊन चिपळूण ते रत्नागिरी असे जात होते. यावेळी कुटरे फाटा येथे प्रवासी उतरवण्यासाठी बस थांबली. याचवेळी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या ट्रक चालक नागनाथ बोयने ( ३५ , कर्नाटक ) बेदरकारपणे गाडी चालवून एसटी बसच्या मागे उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार सादिक आरिफ सोलकर ( २५. रा . कातळी , राजापूर ) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या दुचाकीच्या मागे बसलेल्या जिदान सोलकर ( १७ ) , खलिजा जैनुद्दीन सोलकर ( १५ , दोन्ही , भोगाळे , चिपळूण ) यांना दुखापत झाली.
पोलिसांनी ट्रक चालक नागनाथ बोधने याच्यावर भादविकलम ३०४ ( अ ) , २७ ९ , ३३७ , ३३८ मोटर वाहन कायदा कलम १८४ , १३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .