(रत्नागिरी)
विधान मंडळातील पॉवरफुल समिती असलेल्या पंचायत राज समिती २६ ते २८ मे या कालावधीत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. जिल्हा परिषद व ९ पंचायत समिती यांच्यासह शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायतीमध्ये धावपळ सुरू झाली आहे. सर्व कर्मचारी अपूर्ण राहिलेले रेकॉर्ड पूर्ण करण्याच्या कामात गुंतलेले आहेत.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास मंत्रालयाकडून विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. त्या निधीचा खर्च कशा प्रकारे झाला, कुठे झाला हे पाहण्यासाठी दर पाच वर्षांनी विधीमंडळातील महत्त्वाची पॉवरफुल समिती समजल्या जाणाऱ्या पंचायत राज समितीचा दौरा आयोजित करण्यात येतो. या समितीला दोषी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे अधिकार आहेत. यामुळे या समितीचा दर पाच वर्षांनी चांगलाच बोलबोला असतो.
जिल्ह्यात ही समिती २६ ते २८ मे या कालावधीत येणार आहे, तसे पत्र जिल्हा परिषदेकडे आले आहे. २६ रोजी समितीचे आगमन होणार असून, त्यादिवशी ते जिल्हा परिषदेचे कामकाज पाहणार आहेत. ते नंतर २७ रोजी पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालयाला भेटी देणार आहे.
या समितीत आमदारांचा समावेश असून, या सदस्यांकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तीनस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामाचे मूल्यमापन केले जाणार आहे. या समितीच्या दौऱ्याने जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत. समितीची बडदास्त ठेवण्यासाठी तसेच कामकाजात त्रुटी राहू नयेत यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. कामकाजात काही त्रुटी राहू नयेत यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत.