( मुंबई )
राज ठाकरे यांनी भोंगा मुद्द्यावर केलेल्या विधानावरून देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. यातच शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वैयक्तिक निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण केल्याप्रकरणी मुंबईत अटक करण्यात आलेल्या नवनीत आणि रवी राणा दाम्पत्याच्या जामिनावरील सुनावणी काल तहकूब करण्यात आली. मुंबईतील सत्र न्यायालयात आता त्यांच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मात्र या निमित्ताने मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयात काही धक्कादायक माहिती दिली.
जामीन अर्जाला उत्तर देताना पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात राणा दाम्पत्य आणि भाजपने राज्य सरकारला हनुमान चालिसाच्या कार्यक्रमातून आव्हान दिल्याचा आणि त्याद्वारे एक मोठा कट शिजला असल्याचा दावा करण्यात आला आहे. यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुद्रोही ठरवले जाणार होते.
जामिनाला विरोध करताना ठाकरे यांना हिंदुविरोधी दाखवण्याचा कट होता, असे म्हणत मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयात दावा केला की, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करणारे राणा दाम्पत्य करत हिंदू धर्मासाठी असा उपक्रम करत असल्याचे दाखवण्यात येणार होते. आघाडी सरकारला आव्हान देण्याचा हा मोठा डाव होता. भाजप आणि ठाकरे यांच्या राजकीय विरोधकांना उद्धव ठाकरे यांना हिंदुद्रोही ठरवून ते हिंदूंच्या हितासाठी काम करत नसल्याचा संदेश देण्यासाठी वातावरण निर्मिती करायची होती, असा दावाही करण्यात आला आहे.
राणा दाम्पत्याने गेल्या शनिवारी म्हणजेच २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील ‘मातोश्री’ या वैयक्तिक निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केली होती. यानंतर शिवसेना समर्थक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. राणा दाम्पत्यानेही मातोश्रीवर न जाण्याचे जाहीर केले, मात्र याच दरम्यान त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर शांतता बिघडवणे, दोन समुदायांमध्ये वैर पसरवणे आणि देशद्रोहाची कलमे लावण्यात आली.