(रत्नागिरी)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून ३ मे रोजी शहरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीचे नियोजन निश्चित झाले आहे. दोन ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळावी यासाठी मनसेकडून शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांना अर्ज दिला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर यांच्या नेतृत्वाखाली हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीचे आयोजन केले आहे. ३ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता मांडवी समुद्र किनारी असणार्या जोंधळ्या मारुती मंदिराजवळ आणि सकाळी ११ वाजता मारुती येथील हनुमान मंदिराजवळ हे कार्यक्रम होणार आहेत.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, प्रत्येक समाजाला वेगळा न्याय लावता येणार नाही. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी राज्यातील आपल्या पदाधिकार्यांना महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्यांच्या बैठकीत येत्या मंगळवारी हा कार्यक्रम ठरवला आहे. या कार्यक्रमासाठी लावण्यात येणार्या ध्वनीक्षेपकाची परवानगी मागण्यात आली आहे. शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांना याबाबतचे निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सौंदळकर, चिटणीस सुनील साळवी, जिल्हासंघटक रुपेश जाधव, मनविसे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, लांजा तालुकासचिव मनोज देवरुखकर, तालुका संघटक प्रकाश गुरव, जयेश दुधरे, विभागअध्यक्ष सचिन कामेरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.