(रत्नागिरी)
राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय गाजत असतानाच रत्नागिरीतील मुस्लीम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचा वापर करून आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनीक्षेपक यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बुधवारी पोलीस अधिक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रत्नागिरी शहर पोलीस स्थानक अंतर्गत शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय मुस्लीम समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आला. यावेळी उपस्थित शांतता कमिटीच्या सदस्यांनी मुस्लीम समाजाच्या या निर्णयाचे कौतुक केले. तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वधर्मीय लोक एकोप्याने राहतात. त्यांच्यातील हा सलोखा कायम रहावा असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरीकरांना केले आहे.
बुधवारी पोलीस मुख्यालयात पोलीस अधिक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दि. 3 मे रोजी रमजान ईद, अक्षय तृतिया हे दोन सण साजरे करण्यात येणार आहेत. हिंदू-मुस्लीमांसह सर्व समाज येथे एकोप्याने राहतात. शेकडो वर्षांची ही परंपरा कायम ठेवत सर्वांनी उत्साहात सण साजरे करावे असे आवाहन डॉ.गर्ग यांनी उपस्थितांना केले. शांतता कमिटीच्या बैठकीत विविध मुद्द्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी मुस्लीम समाजाच्या वतीने रफीक बिजापुरकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली.
मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय राज्यात गाजत असताना रत्नागिरीतील मुस्लीम बांधवांनी भोंग्यांचा आवाज मर्यादीत ठेवणारी आहुजा कंपनीची अत्याधुनिक यंत्रणा सर्व मशिदींवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहाटेच्या सुमारास अत्यंत कमी वेळात व कमी आवाजात अजान दिली जाईल. तर इतर वेळीसुद्धा मर्यादीत आवाजात अजान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसात होणार असल्याचे श्री.बिजापुरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अमोल श्रीनाथ यांनीही रत्नागिरीत हिंदू-मुस्लीम बांधव लहानपणापासून एकत्रित रहात आहे. भोंग्याचा आवाज मर्यादीत झाल्यास मनसेचा कोणताही आक्षेप नाही. आम्ही सर्व समाजाचे बांधव एकत्रितपणे आमचे सण, उत्सव साजरे करणार असल्याचे स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध धर्माचे, जातीचे लोक वास्तव्याला आहेत. परजिल्ह्यासह राज्यात, देशात कोणतीही अनुचित घडली तरीही येथील सर्वधर्मियांचा सलोखा यापूर्वीही कायम राहिला आहे, यापुढेही कायम राहील असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
सोशल मिडियाचा वापर करणे हा प्रत्येकाचा हक्क असला तरीही आपल्या पोस्टमुळे कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता प्रत्येकाने घ्यायची आहे. व्हॉटस्ॲप ॲडमिननेही याबाबत आपल्या सदस्यांना सूचना द्याव्यात. केवळ सणांपुरते नव्हे तर कायमस्वरूपी सर्वधर्मियांमध्ये सलोखा राहील, यासाठी सर्व रत्नागिरीकरांनी प्रयत्न करावेत असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ.गर्ग यांनी केले.
शांतता समितीच्या बैठकीला श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्ना सुर्वे, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, कर्मचारीनेते सुधाकर सावंत, आरपीआयचे एल.व्ही.पवार, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष निलेश भोसले, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक महेश गुंदेचा, मराठा मंडळाचे पदाधिकारी केशवराव इंदुलकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर तर पोलीस उपअधिक्षक (गृह) एस.एल.पाटील, शहर पोलीस निरीक्षक विनित चौधरी, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, महेश कुबडे आदी उपस्थित होते