संगमेश्वर/प्रतिनिधी
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील गणेश मंदिरसमोर शनिवारी रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतुक सुमारे चार तास ठप्प झाली होती. ट्रकचालक गुरूराज चारखानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुराज हिरन्नाथ चारखानी हा आपल्या ताब्यातील ट्रक जयगड ते कोल्हापूरच्या दिशेने कोळसा भरून घेऊन जात असताना आंबा घाटातील गणेश मंदिरसमोर ट्रक आला असता कोल्हापूरहून रत्नागिरीकडे साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ट्रकचालक गुरूराज चारखानी हा ट्रकमध्येच अडकून पडला. अपघात घडल्यानंतर दोन्ही ट्रक रस्त्याच्या मध्यभागी असल्याने महामार्गावरील वाहतूक चार तास खोळंबली होती.
अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे पोलिस हेड कॉन्स्टेबल राहूल गायकवाड, कॉन्स्टेबल वैभव कांबळे, महिला पोलीस नाईक हेमलता गोतावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना गुरूराज हा गंभीर जखमी अवस्थेत ट्रकमध्येच अडकून पडल्याचे निदर्शनास आले. यानंतर गुरूराजला ट्रकबाहेर काढण्यासाठी जेसीबी मागवण्यात आला. जेसीबीच्या सहाय्याने गुरूराजला बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचारासाठी साखरपा आरोग्य केंद्रात आणण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले.
अपघातग्रस्त दोन्ही ट्रक जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आल्यावर तब्बल चार तास ठप्प झालेली महामार्गावरची वाहतुक साखरपा पोलीसांनी पुर्ववत सुरू केली. दरम्यान, या अपघातप्रकरणी ट्रकचालक गुरूराज चारखानी याच्याविरोधात साखरपा पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास साखरपा पोलीस करीत आहेत.