(मुंबई)
राज्यात जेव्हापासून ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून महाराष्ट्राला ग्रहण लागले आहे. त्यामुळे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याची इच्छा आपण व्यक्त केली आहे. पंरतु आम्हाला मुंबईत येऊन दाखवाच, अशी धमकी शिवेसेनेकडून दिली गेली आहे. तर त्यांनी मुंबईत येऊनच दाखवावंच, असं आव्हान माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिलं आहे.
मात्र, हनुमान चालीसाचे पठण करण्यापासून मुख्यमंत्रीही अडवू शकत नाहीत. शनिवारी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्यावर आपण ठाम असल्याची भूमिका आ. रवी राणा आणि खा.नवनीत राणा यांनी घेतली आहे. राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत, शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणारच, अशी भूमिका घेतल्याचे बोलून दाखवले. आपण पोलिसांना सहकार्य करणार असून कायदा-सुव्यवस्था बिघडू देणार नाही, असेही राणा दाम्पत्यांनी जाहीर केले आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नाही. मातोश्री आमचे श्रद्धास्थान आहे. आम्ही श्रद्धेने मातोश्रीची वारी करणार आहोत. त्यामुळे आम्हाला रोखण्याचं कारण नाही. आम्ही दहशतवादी नाहीत. आम्ही शस्त्र नाही तर हनुमान चालीसा घेऊन जाणार आहोत. तसेच आम्हाला आव्हान देणाऱ्या शिवसैनिकांचा हनुमान चालीसाला विरोध का? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे त्या म्हणाल्या.
राज्याच्या राजकारणात शिवसेना विरूद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष चांगलाचा पेटला आहे. राणा दाम्पत्य मुंबईत आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून मातोश्री परिसरात जाऊ नये, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सांगितले आहे. उद्या सकाळी 9 वाजता ते मातोश्रीवर जाणार आहेत. पण त्याआधीच पोलीस त्यांना ताब्यात घेण्य़ाची शक्यता आहे. राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुंबईतील खारच्या घराबाहेर शिवसैनिक रात्रभर खडा पहारा देणार आहेत. राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू न देण्याची व्यूहरचना शिवसैनिकांनी आखली आहे. कालपासूनच शिवसैनिक तिथं जमले असून त्यांनी भजन-कीर्तन सुरू केलं आहे. बॅरिकेटिंग करण्यात आलं असून त्याच्या बाहेरच्या बाजुला शिवसैनिक जमले आहेत.