(संगमेश्वर)
तालुक्यातील डिंगणी चाळकेवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात सुवर्ण महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. श्री हनुमान जयंतीचा तीन दिवसीय कार्यक्रम विविध उपक्रमांनी भारलेला होता. यामध्ये हनुमानजींचा जन्मोत्सव, कोंडाच्या बावाची पूजा, महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम इत्यादी सामाजिक व धार्मिक कार्यक्रम झाले.
लांजा येथील प्रसिद्ध नमन मंडळाने कोकणची लोककला झांजगी नमन सादर केले. त्यातील गण-गौळण, वगनाट्य, स्वरचित गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली. जल्लोषमय वातावरणात सर्व बाळ-गोपाळ, आबालवृद्ध, स्त्री-पुरुष स्वच्छंदपणे नाचले.
गावातील प्रत्येक तरुणाने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रमदान तसेच आर्थिक सहकार्य केले. मंडळाचे 50 वे स्थापना वर्ष आणि तरुणांचा सहभाग हेच सांगून जाते की ही एकजुट कायम राहणार असून मंडळाचा हीरक महोत्सवसुद्धा याच जोमाने साजरा करणार आहे. मंडळाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान उपसरपंच मिथुन निकम यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले व आता लक्ष ‘हीरक महोत्सवाचे’ हा नारा दिला. अशा प्रकारे मंडळाचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम चिरंतन काळ उपस्थित सर्व भक्तगणांच्या स्मरणात राहील असे मंडळाच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले.