(रत्नागिरी)
सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवक 50 टक्के पदभरतीतील सरळसेवा परीक्षा पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळण्यास विलंब होत असल्याने पात्र उमेदवारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या उमेदवारांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
कोरोना काळात मनुष्यबळ कमी असल्याने राज्य शासनाने आरोग्य सेवेत तत्काळ भरती करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी 28 फेब्रुवारी 2021 ला आरोग्य सेवक 50 टक्के व 40 टक्के पदासाठी सरळसेवा परीक्षा घेण्यात आली. यामधील 40 टक्के मधील आरोग्य सेवक भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र बोगस प्रमाणपत्रधारकामुळे 50 टक्के भरती प्रक्रिया रखडली आहे. या परीक्षेचा निकाल लागून 9 महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. पात्र उमेदवारांचे समुपदेशसुध्दा घेण्यात आले. या समुपदेशन काळात बरेच बोगस प्रमाणपत्रधारक उमेदवार मिळाल्याने त्यांना अपात्र करण्यात आले. अपूर्ण कागदपत्र असूनही जिल्हा हिवताप अधिकारी, पुणे हे वरिष्ठांचे आदेश पायदळी तुडवून अपूर्ण कागदपत्र उमेदवारांना पडताळणी पाठवत आहेत, असा आरोप उमेदवार करत आहेत.
जिल्हा हिवताप कार्यालयातील उमेदवारांना सहसंचालक पुणे यांच्या भरती प्रक्रियेबाबत परिपत्रकानुसार 1 ते 9 कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच पुणे जिल्हा हिवताप कार्यालयात मोठया प्रमाणात बोगस प्रमाणपत्र उमेदवार निदर्शनास आल्यानंतर संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग पुणे यांनी 12 जानेवारी 2022 रोजी या भरतीबाबत 1 ते 22 कागदपत्रांचे नवीन परिपत्रक जारी केले. त्यानुसार पदभरती करण्याचे आदेश दिले.
सरळसेवा पास होवून देखील पदभरतीला विलंब होत आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया होईल की नाही या चिंतेत पात्र उमेदवार आहेत. या आठवडाभरात योग्य तो निर्णय न झाल्यास पुन्हा आत्मदहनासारखा टोकाचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत रत्नागिरीतील पात्र उमेदवार आहेत.