(प्रतिनिधी/रत्नागिरी)
गरोदर मातांना त्यांच्या या महत्त्वाच्या प्रसूतीपूर्व कालावधीत पुरेसा सकस आहार व व्यायाम हा आवश्यक असतो परंतु तो ग्रामीण भागात मात्र मिळतोच असे नाही. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या सहाय्याने सामूहिक डोहाळे जेवण हा अनोखा व आवश्यक उपक्रम रत्नागिरी तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच फक्त कोतवडे गावातच करीत आहोत असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका सौ. अनघा सुर्वे यांनी केले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजनेअंतर्गत कोतवडे गावातील कोतवडे, ढोकमळे, मुसलमानवाडी, ऊंबरवाडी या चार महसूल गावासाठी आरोग्य, पोषण, पाणी, स्वच्छतेसाठी आशा सेविकांकरवी ग्राम आरोग्य पाणीपुरवठा आणि स्वच्छता समिती अंतर्गत आलेल्या अनुदानातून गावातील गरोदर मातांना अनोखे असे सामूहिक डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोतवडे क्र-1 येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून हे आयोजन केले होते.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमावेळी आरोग्य व पाणीपुरवठा आणि स्वच्छता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच तुफील पटेल, उपसरपंच संतोष बारगोडे, ग्रामविकास अधिकारी देवीदास इंगळे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती ज्योती मयेकर, सौ दिया कांबळे, सौ पायल पांचाळ, प्राथमिक आरोग्य केंद्रच्या गौरी कांबळे, आरोग्यसेविका सौ. अनघा सुर्वे, योग प्रशिक्षिका सौ. एकावडे, आशा सेविका सौ. लांजेकर, सौ. माने, सौ. शितप, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि गावातील गरोदर माता तसेच अनेक महिला उपस्थित होत्या.
या डोहाळे जेवणाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे येथील आयुष्मान भारत योजना ‘आरोग्य वर्धिनी’ अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या योग प्रशिक्षणाच्या प्रशिक्षिका सौ एकावडे यांनी उपस्थित महिलांना समतोल आहार व अष्टांग योग व प्राणायाम यासंदर्भात माहिती दिली. कोतवडे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दर शुक्रवारी सकाळी 10 ते 11 या वेळेत महिला व पुरुषांसाठी योगाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या आरोग्य विषयक अनुदानातून गावातील प्रत्येक महिलेला मोफत सॅनिटरी नॅपकिन्स देण्यात येणार आहेत.
हा नाविन्यपूर्ण व अनोखा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व आशा सेविका, अंगणवाडी सेविका , अंगणवाडी मदतनीस यांनी विशेष मेहनत घेतली.