(मुंबई)
बँकांचे बदलले वेळापत्रक आजपासून पूर्वपदावर येणार आहे. कोरोनामुळे बँकांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे बँकांचे वेळापत्रकही पूर्ववत करण्यात आले आहे. आज सोमवारी, १८ एप्रिलपासून बँका पुन्हा सकाळी ९ वाजल्यापासून सुरु होणार आहेत.
शेअर बाजारदेखील ९ वाजता उघडणार
बँका पुन्हा पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरु होणार असल्याने ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. आणखी एक तास अधिक वेळ बँका उघड्या राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने १८ एप्रिल २०२२ पासून बँका उघडण्याच्या वेळेत बदल केला आहे. यापुढे बँका ९ वाजता उघडणार आहेत. वाढत्या उष्म्यामुळे ग्राहकांना सकाळी लवकर बँकेत जाऊन आपले व्यवहार करणे आता सुलभ जाणार आहे. कोरोना महामारीमुळे रिझर्व्ह बँकेने बँकांची उघडण्याची वेळ कमी केली होती. आता पुन्हा ही वेळ नियमित केली जात आहे. आरबीआयद्वारे संचलित मार्केटच्या ट्रेडिंगच्या वेळा देखील बदलल्या आहेत. शेअर बाजार देखील १० ऐवजी सकाळी ९ वाजता उघडणार आहेत.
आरबीआयने सर्व बँकांना कार्डलेस एटीएम व्यवहाराची सुविधा लवकरच सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना लवकरच युपीआय द्वारे बँक आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. कार्डलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआय हे पाऊल उचलत आहे. यासाठी सर्व बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा युपीआय द्वारे दिली जाईल. कार्डलेस कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये एटीएम पिनऐवजी मोबाइल पिन वापरला जाईल, ज्यामुळे एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.