(फुणगूस/एजाज पटेल)
गावामध्ये असलेला कार्यक्रम आणि डॉक्टरांनी सांगितलेली सक्त विश्रांती घेण्यासाठी तो गावाकडे येत होता… मात्र कुरधुंडा येथे आला असताना त्याने समोर अपघात पाहिला… डंपर आणि ईर्टीगा गाडी मध्ये झालेला अपघात…. यामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना त्याने मदतीचा हात दिला…. जखमी प्रवाशांना घेऊन तो रुग्णालयात गेला…. तेथे तो त्यांच्यावर उपचार होईपर्यंत थांबलाही…जखमीवर यशस्वी उपचारही झाले…स्वतःला हवी असलेली विश्रांती विसरून तो दिवसभर अपघातग्रस्तांच्या मदतीमध्ये गुंतला होता.
जखमींवर यशस्वी उपचार झाल्यानंतर तो घरी परतला खरा, मात्र घरी आल्यानंतर त्याला कसेतरीच होऊ लागेले, डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली आणि त्यात आलेल्या फिटमध्येच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. संगमेश्वर जवळच्या मुचरी मोरे वाडी येथील उत्तम क्रीडापटू असलेल्या अभिषेक महेंद्र भुवड याच्या मृत्यूमुळे गावासह नातेवाईक, त्याचा सारा मित्र वर्ग शोकसागरात बुडाला आहे.
अभिषेक याच्या आजीचा शिमगोत्सवा दरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी अभिषेकला डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले होते. त्यासाठीच तो गावाला येत होता. मुंबईहून रत्नागिरी येथे आल्यानंतर तो आणि त्याचा मित्र मुचरी येथे येण्यासाठी निघाले होते. कूरधुंडा येथे आले असता, समोर तेथे डंपर आणि इर्टिगा चा अपघात झाला होता. त्यावेळी मदतीच्या हेतूने अभिषेकने गाडी थांबवली, ईर्टीगा गाडीमध्ये जाऊन त्याने स्वतः छोट्या बाळाला बाहेर काढले आणि नंतर त्यामध्ये एक आजी होती तिला बाहेर काढायला गाडीमध्ये गेला. तिला दुसऱ्या गाडीमध्ये घेऊन आजीला त्वरीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे गरजेचे होते. त्याने व त्याचा मित्र या सर्वांना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. डॉक्टरानी आजीला तातडीने रत्नागिरीला घेऊन जावं लागेल असे सांगितल्यावर त्यांनी आपल्या मित्रांसह आजीला रत्नागिरीला घेऊन गेले. अपघातामध्ये जखमी झालेल्या आजीला बरे वाटेपर्यंत अभिषेक रुग्णालयातच थांबून होता. त्यानंतर तो मुचरी येथे परत आला.
या सर्व प्रप्रकरणामुळे व दगदगीने अभिषेक खूप थकला होता. घरी आंघोळ करून तो विश्रांतीकरता थांबला असता त्याला फिट येऊन तेथे त्याचा मृत्यू झाला. गावामध्ये अभिषेक हा सर्वांचा आवडता होता. अभिषेक हा कबड्डी आणि खो-खो मध्ये तरबेज होता. गावामध्ये तो अनेकवेळा खेळण्यासाठी येत असे. त्यामुळे तालुक्यामध्ये त्याचे नाव प्रख्यात होते आपल्या प्रामाणिक स्वभावामुळे त्याने अनेक मित्र जोडले होते. अशा गुणी अभिषेकचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या मित्र परिवारामध्ये शोककळा पसरली आहे.