(रत्नागिरी/प्रतिनिधी)
जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याच्या रागातून तालुक्यातील चाफे-गणपतीपुळे नवीन रस्ता कामावरील अभियंता रवीरंजन पांडे यांच्यासह जेसीबी चालक श्रीकांत यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
आशियाई विकास बँक निधीतून चाफे-गणपतीपुळे रस्त्याचे काम सुरु आहे. 10 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 24 कोटी खर्च येणार असून 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून कोल्हापूरच्या आर. बी. वेल्हाळ कंपनीला रस्त्याचे काम सोपवण्यात आले आहे. या रस्ता कामात जागा जात असून त्याचा मोबदला मिळावा यासाठी दत्ताराम चव्हाण व इतरांनी न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने वादातीत जागेत काम होणार नाही असे हमीपत्र दिले आहे.
चव्हाण यांनी आपल्या जागेच्या हद्दीत चिरे लावले असून त्या जागे बाहेरुन रस्त्याचे काम सुरु असताना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दत्ताराम चव्हाण व मुलगा सिध्देश चव्हाण आणि काही लोकांनी जेसीबी चालकासह अभियंता रवीरंजन पांडे यांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.