रत्नागिरी/प्रतिनिधी
विविध वस्तूंबरोबरच रत्नागिरी हापूसही ऑनलाईन मार्केटींग करणार्या कंपन्यांकडून विक्री केला जात आहे. त्यात अॅमेझॉन कंपनीही उतरली आहे. थेट बागायतदारांकडून आंबा खरेदीला अॅमेझॉनने सुरवात केली आहे. रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र चालू केले असून आरंभीलाच १२ शेतकर्यांकडून ६०० डझन आंब्याची खरेदी केली आहे. १८५ ते २२० ग्रॅमपर्यंतचे पिकलेले फळ प्रतिडझन ९०० रुपयांनी खरेदी करण्यात आले.
रत्नागिरीतील आंबा संकलन केंद्राचे उद्घाटन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, आंबा बागायतदार समीर दामले, प्रमुख व्यवस्थापक राजेश प्रसाद, विवेक धवन, सुजय हेगडे, नरेंद्र जवळे, श्री. कल्पेश यांच्यासह बागायतदार उपस्थित होते. हे अॅमेझॉनचे महाराष्ट्रातील चौथे तर भारतातील सातवे संकलन केंद्र आहे. येथे आंबा बागायतदारानं कडून आंबा विकत घेऊन मुंबई तसेच पुणे येथील ऍमेझॉनच्या ग्राहकांना पोहचवला जाणार आहे. भविष्यात देशाच्या कानाकोपर्यात नव्हे तर निर्यातही केला जाणार आहे.
आंबा खरेदी केल्यानंतर बागायतदाराला त्वरीत पैसे दिले जाणार आहेत. तसेच आंबा बागायतदार राजेश पालेकर यांच्या सुचनेनुसार पुढील आठवड्यापासून बिटकी आंबाही खरेदी केली जाईल असे प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी श्री. जोशी म्हणाले, कोरोना ही बागायतदारांसाठी इष्टापती ठरली आहे. अनेकांनी दलालावर अवलंबून न राहता थेट ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. अॅमेझॉनच्या रुपाने बागायतदारांना मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्याचा उपयोग करुन दर्जेदार आंबा कंपनीला दिला तर बागायतदाराला चांगला दरही मिळेल. अॅमेझॉनसारख्या कंपन्या थेट विक्रीसाठी येऊ लागल्यामुळे शेतकर्याला दर ठरवता येणार आहे. ही भविष्याची नांदी ठरणार आहे. तर बागायतदार समीर दामले म्हणाले, बागायतदार पुर्वी दलालावर अवलंबून राहत होता. तो सांगेल तोच दर ठरवला जाई. आता कंपनी थेट खरेदी करत असल्याने दर चांगला मिळेल. जीआयमुळे (भौगोलिक मानांकन) गुणवत्तेला प्राधान्य मिळणार आहे.