रत्नागिरी : स्पेशल ऑलिंपिकसाठी मतिमंद विद्यार्थी आणि प्रौढांसाठी राष्ट्रीय क्रीडा फेडरेशनच्या माध्यमातून आविष्कार संस्थेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६५ खेळाडूंची दंतचिकीत्सा आणि आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले. याला खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. या खेळाडूंच्या तपासणीनंतर युनिक कार्ड आणि क्यू आर कोड काढला असून तो स्कॅन केल्यानंतर स्पर्धेकरिता या खेळाडूंच्या आरोग्याची माहिती तत्काळ कळणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त स्पेशल ऑलिम्पिक भारतने समावेशन क्रांती ही बौध्दिक अक्षम दिव्यांगांसाठी मोहिम सुरू केली आहे. मागील दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर या मुलांना पुन्हा क्रीडा क्षेत्रात आणण्याचा हा एक प्रयत्न आहे. याचाच पहिला टप्पा म्हणजे संपूर्ण भारतभर आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त निरोगी अॅथलीट कार्यक्रमाचे आयोजन केले. आज भारतात एकाच दिवशी 75000 अॅथलिटचे 75 शहरांतून दंतचिकीत्सा व आरोग्य तपासणी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात हा कार्यक्रम आविष्कार संस्थेत आयोजित केला होता.
स्पेशल ऑलिंपिक भारतमार्फत निवड केलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या टीममार्फत विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. झाराप -सिंधुदूर्ग, अनुग्रह-खेड, जिद्द – चिपळूण, आविष्कार शाळा- कार्यशाळा अशी एकूण 165 विद्यार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला. जनरल फिजिशियन डॉ. विवेक इनामदार, दंतचिकित्सक डॉ. अमित सोनावणे, डॉ. राज शेटये, डॉ. आनंद पॉल, डॉ. सबा खान, डॉ. राजेंद्र बाड, डॉ. चिनार खातू या तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी स्पेशल ऑलिंपिक भारतमार्फत १० स्वयंसेवक मुंबईतून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा समाजकल्याण अधिकारी अजय शेंडे, तालुका क्रीडा अधिकारी रुही शिंगाडे यांनी केले. या वेळी बॅडमिंटन कोच तसेच इंटरनॅशनल खेळाडू सौ. सरोज सावंत, टाऊन प्लानिंग ऑफिसर अजय यादव, दंतवैद्य डॉ. कांबळे, आविष्कार संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. दीप्ती भाटकर, खजिनदार डॉ. शरद प्रभुदेसाई, संस्था सदस्या पद्मजा बापट, जिद्द शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिवाडकर उपस्थित होते.
स्पेशल ऑलिंपिक भारतच्या माध्यमातून सर्व सहभागींना जेवण, नाश्ता, पाणी, स्पोर्ट टी-शर्ट देण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना स्पेशल ऑलिंपिक भारतचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा शामराव भिडे कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर यांनी केली. जिल्हा स्पोर्ट डायरेक्टर तथा चिपळुणच्या जिद्द शाळेच्या सुनील शिंदे यांनी ऑलिंपिकविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. समिना काझी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन वायंगणकर, सुनील शिंदे यांच्यासह आविष्कार संस्था, संस्था कर्मचाऱ्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
यापूर्वी स्पेशल ऑलिम्पिक भारतमध्ये रत्नागिरीची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यामध्ये शामराव भिडे कार्यशाळेचा शिवदास पिलणकर (कॅनडा, फ्लोअर हॉकी विजेता), सुमैया पटेल (चीन, बॅडमिंटन विजेती), विद्या मोडक (बॅडमिंटन राष्ट्रीय विजेती), जिद्द मतिमंद शाळेचा अमोल मोरे (अबुधाबी, पॉवर लिफ्टिींग विजेता) यांनी यश मिळवले आहे. आता स्पेशल ऑलिंपिकमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंची संख्या वाढेल, असा विश्वास सचिन वायंगणकर यांनी व्यक्त केला.