(लांजा/प्रतिनिधी)
बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने लांजा तालुक्यातील पालू परिसराला झोडपले. घरांचे पत्रे उडाले, हापूसची झाडे उन्मळून पडली, विद्युत वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडून वीज वाहिन्या तुटल्या. गुरांची वैरण व पावसाळी सरपण भिजले. तब्बल अर्धा तास कोसळलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.
लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील माचाळ, कोचरी, पालु, शिपोशी, सालपे, गोविळ, खोरनिनको, खेरवसे, वाडगांव, कोर्ले, वेरवली, भांबेड या भागांत जोरदार पाऊस पडला. एका घराशेजारील झाड उन्मळून पडले. तर एका घरावरील पत्रे 10-20 फुटापर्यंत उडाले. घरातील सामानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तसेच लांजा तालुक्यामध्ये मशागतीची कामे पूर्णत्वाला गेलेली नाहीत. मात्र पाऊस अधून मधून पडत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आंबा-काजू गळून पडल्याने बागायतदारांचे नुकसान झाले.