(रत्नागिरी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत, रत्नागिरी शिरगांव येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे तृतीय वर्षाचे सत्र ५ मधील विद्यार्थ्यांचे मासेमारी नौका बांधणी या विषयांतर्गत फायबरग्लास मासेमारी नौका बांधणी तंत्रज्ञानाच्या सखोल अभ्यासासाठी कार्यानुभव कालावधीमध्ये ओम साई मरीन, फायबरग्लास बोट बिल्डर, पेठकिल्ला रत्नागिरी येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणा अंतर्गत सहभागी विद्यार्थी, विविध प्रकारचे फायबर मासेमारी नौकांचे फायबर साचे तयार करणे व साच्यापासून नौका तयार करून त्यावर डेक, केबिन तयार करणे तसेच डेकवरती विविध प्रकारची मासेमारी साधने बसविणे आणि इंजिन व त्यांची उपकरणे बसवून नौका कार्यान्वित करणे याचा प्रत्यक्ष व्यावहारिक अनुभव घेत आहेत. श्री. श्रीधर मिस्त्री, श्री. शकील पटेल, श्री. प्रदीप वरकर, श्री. इम्तेहाज भाटकर, श्री. नवशाथ भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली फायबर मासेमारी नौका बांधणी कशी केली जाते याचे ज्ञान अर्जित करत आहेत.
या प्रशिक्षणामध्ये तीन विद्यार्थिनी कु. ईशा भोळे, रुची भोळे, सायली लोंढे व पाच विद्यार्थी कु. संचित वाघे, पौरस घडी, अथर्व परब, प्रथम गोलटकर, ओजस भरणकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक श्री. निलेश मिरजकर, बोटमन श्री. सचिन कुबल, यांनी मत्स्य अभियांत्रिकी पदविका संस्थेचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.