(देवरुख / प्रतिनिधी)
२६ व्या विद्यार्थी विशेष-२०२४, गॅलरी प्रदर्शक वार्षिक विद्यार्थी कला प्रदर्शनामध्ये कनकाडी गावचा सुपुत्र सागर प्रदीप जाधव याच्या ५ निसर्गचित्रांचा समावेश झाला आहे. कनकाडी, ता: संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जाधव यांचा सागर हा सुपुत्र असून, सागर सध्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आणि व्हीज्युअल आर्ट, सायन-मुंबई येथे बॅचलर इन फाईन आर्ट मधील द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे.
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातून सागर याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक संघाचे प्रतिनिधित्व करून अभिनय आणि चित्रकला प्रकारांमध्ये राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात चमकदार कामगिरी केली होती.
२६व्या विद्यार्थी विशेष-२०२४ प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील ११ कला महाविद्यालयातील ३१ विद्यार्थ्यांच्या ११६ चित्रांचा समावेश असून, यामध्ये सागरची ५ निसर्गचित्रे निवडली गेली आहेत. सागरने या ५ निसर्गचित्रांमध्ये देवरुख परिसरातील ३ चित्रे, तर प्रत्येकी १-१ चित्र ग्रँड रोड, मुंबई आणि पनवेल परिसरामध्ये चितारली आहेत. हे ऑनलाइन प्रदर्शन दि.१६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०२४ या कालावधीतhttps://www.gallerypradarshak.com/2024/08/26th-vidyarthi-vishesh.html या लिंक वर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी: गॅलरी प्रदर्शन, १०० कल्पना बिल्डिंग, ग्राउंड फ्लोअर, प्लॉट नं.३३८, १२वा रोड, खार-वेस्ट, मुंबई-५२ या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सागर जाधव याच्या ५ चित्रांच्या निवडीबद्दल देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, कलाशिक्षक सुरज मोहिते, विलास रहाटे, प्रा. धनंजय दळवी, तसे देवरुख महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
फोटो- सागर जाधव याने साकारलेल्या पाच निसर्गचित्रांचा कोलाज.