(रत्नागिरी)
नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर झालेल्या अत्याचार विरोधात आता नवीन माहिती पुढे आली आहे. चंपक मैदानावर तरुणीसोबत झटापट झाली. तिच्या अंगावर जखमा आहेत. याबाबतचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली आहे. मात्र फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येण्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळपासूनच रत्नागिरीतील वातावरण तंग झाले होते. नर्सिंग चे शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचा दाखल झाला आणि त्यानंतर वातावरण तापू लागले. रात्री उशिरापर्यंत संतप्त जमावाने गर्दी केली होती. यावेळी संतप्त जमाव आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमकी झडल्या. मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होतं. मात्र तरीदेखील जमावाने आक्रमक भूमिका सोडली नाही.
मंगळवारी सकाळी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा रुग्णलायात जाऊन तरुणीची विचारपूस करून तिला धीर दिला. या सर्व घटनेची माहिती त्यांनी पोलिसांकडून जाणून घेतली. याबाबत माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले की, तरुणीसोबत झटापट झाली आहे. तिच्या हातावर जखमा दिसून आल्या आहेत. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी झाली असून काही नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत. त्याचा अहवाल पुढील आठ ते दहा दिवसात अपेक्षित असून त्या अहवालानंतर या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.
१९ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारप्रकरणाचा तपास करण्यासाठी ‘एसआयटी’ची स्थापना केली आहे. यात एक महिला निरीक्षक तपास अधिकारी म्हणून काम पाहणार असून, दोन महिला उपनिरीक्षक आणि तांत्रिक आणि सायंटिफिक तपास कामाचा अनुभव असलेले इतर पोलीस कर्मचारी यांचा सामावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.