(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने वेटलिफ्टिंग प्रशिक्षण सुरू झाले असून या वेटलिफ्टिंग प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तबगार क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी मार्गदर्शक श्रीम. झोरे आणि क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या खेळाडूंचा उल्लेख करून मानवी जीवनामध्ये खेळाचे महत्व विशद केले.सभाध्यक्ष बंधू मयेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाची महती विशेद करुन वेटलिफ्टिंग प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनाबद्दल आणि मार्गदर्शनाविषयी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांचे, तसेच वेटलिफ्टिंग असोसिएशनचे जिल्हा सचिव श्रीमती झोरे यांचे कौतुक करून धन्यवाद दिले.
या वेटलिफ्टिंग प्रशिक्षणामध्ये जाकादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील २५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उत्साह आणि उपजत कौशल्य लक्षात घेऊन वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात जाकादेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालाचे विद्यार्थी वेटलिफ्टींग प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारून आपले उचित उद्दिष्ट साध्य करतील अशा आशावाद मार्गदर्शक श्रीम. समिधा संजय झोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.