(मुंबई)
मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फूट उंच पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे हा पुतळा कोसळल्याचा दावा राज्य शासनाने केला असला, तरी या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. नौदल दिनानिमित्त गतवर्षी ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा उभारल्याचा दावा करत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांसह मालवण येथील या विभागाच्या कार्यालयात शिरून मोडतोड केली. मात्र, या पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे होती, असा दावा राज्य सरकारने केला आहे. पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची असल्याचा दावाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 35 फुटांचा हा पुतळा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनारी नौदल दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते.
विरोधी पक्ष महाविकास आघाडीने या घटनेवरून राज्य सरकारला लक्ष्य करीत पुतळा कोसळल्याच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आजही भक्कम आहेत. पण २०२३ मध्ये सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झाला. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील पैसे खाल्ले यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भ्रष्ट कारभारावर टीका केली. टक्केवारीत अडकलेल्या सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण असून या घटनेची चोकशी झाली पाहिजे, संबंधित कंत्राटदाराची सुरू असलेली सर्व कामे तातडीने काढून घ्यावीत तसेच महाराजांची अवहेलना करणाऱ्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. आमचं आणि साऱ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही! निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईत बनवलेलं आणि मोदीजींच्या हस्ते उद्धाटन झालेलं छत्रपती शिवरायांचं मालवण इथलं स्मारक आज केवळ ८ महिन्यातच कोसळलं. मिंधे सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवट ह्याला कारणीभूत आहेच, पण त्याहूनही घातक अशी भाजपाची मानसिकता कारणीभूत आहे. आम्ही काहीही करु आणि त्यातून बिनधास्त सुटू असा अहंकार त्यांच्यात आहे. त्याच अहंकारापोटी महाराजांच्या स्मारकाचं गांभीर्य लक्षात न घेता घाईत ते बनवण्यात आलं. केवळ महाराजांच्या प्रतिमेचा वापर करण्याचा हेतू होता, त्यामुळे त्या स्मारकाच्या गुणवत्तेकडे लक्षच दिलं गेलं नाही. स्थानिकांचं म्हणणंही ऐकलं नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आमची अस्मिता आहे .हा पुतळा नौदलाने उभारला होता. पुतळ्याचा आराखडा आणि संपूर्ण रचना नौदलाने केली होती . या घटनेबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी ४५ किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामध्ये पुतळ्याचे नुकसान झाले. उद्या नौदलाचे अधिकारी येणार आहेत. कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज व अधिकार नाही. उद्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुन्हा उभारणीच्या कामाला सुरुवात केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभा केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सांगितले. लवकरच त्याच ठिकाणी आपल्या महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिमाखात आणि मजबुतीने उभा राहिलेला तुम्हाला दिसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.