(रत्नागिरी / प्रतिनिधी)
काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी समुद्र किनारी केलेले बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र अनधिकृत बांधकाम व बेकायदेशीर वाळू उत्खननप्रकरणी समाधानकारक खुलासा केल्याने क्रिकेटर प्रवीण आमरे यांना बजावलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी साडेबारा लाखाची नोटीस बजावली होती.
प्रवीण आमरे यांची गणपतीपुळे ते जयगड दरम्यान रिळ (ता. रत्नागिरी) येथे समुद्रकिनारी जागा आहे. या जागेत त्यांनी अनधिकृत बांधकाम व बेकायदेशीर वाळू उत्खनन केल्याची तक्रार माहिती अधिकारी कार्यकर्त्याने केली होती. याबाबत तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अहवालही दिला होता. या अहवालानुसार तहसीलदार म्हात्रे यांनी आमरे यांना नोटीस बजावून १५ दिवसात खुलासा करण्याची सूचना केली होती. हा खुलासा आमरे यांनी केला असून, तो समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.