(लांजा)
केंद्रीय अन्न व औषध सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नियमानुसार अन्न व औषध खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांनी फास्टटॅग प्रशिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याच अनुषंगाने लांजा येथे नुकतेच फास्टटॅग प्रशिक्षण लांजा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये पार पडले.
केंद्रीय अन्न व औषध सुरक्षा व मानके प्राधिकरण अधिनियम २००६ व त्या अंतर्गत नियम २०११ व नियमन मंत्रालय नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार फास्टटॅग ट्रेनिंग घेणे व्यापाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलेले आहे. यामध्ये व्यापाऱ्यांना फुड हँडलर प्रशिक्षण देण्यात आले. भारतीय कायद्यातील तरतुदीनुसार लोकहिताला प्राधान्य देऊन कोविड सारख्या महामारीचा विचार करता अन्नपदार्थ आणि कोणतेही शरीरात सेवन करणारे पदार्थ यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने हे प्रशिक्षण देण्यात आले.
हे प्रशिक्षण आस्थापना धारकाने पूर्ण केल्यावर परवानाधारक यांच्या नावाने सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत. हे सर्टिफिकेट अन्न परवाना नूतनीकरण करणेसाठी बंधनकारक असणार आहे. याशिवाय आता परवाना नूतनीकरण होणार नाही. तसेच हे सर्टीफिकीट प्रत्येक दुकानात प्रथम दर्शनी ठिकाणी लावायचे असल्याचे देखील बंधनकारक करण्यात आलेले आहे.
या प्रशिक्षणाला लांजा शहर व तालुक्यातील किराणा व्यापारी, हॉटेल व्यवसायिक व विविध वस्तूंचे व्यापारी यांनी या प्रशिक्षणामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग घेतला असल्याची माहिती लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी दिली.