(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भाट्ये खाडीच्या मुखाशी साचलेल्या गाळामुळे मच्छिमार नौका उलटली. खाडीच्या मुखाजवळ असलेल्या गाळाने मच्छीमार नोका हैराण केले आहे. गाळ काढण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. गुरुवारी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बुडालेली नौका सज्जाद साखरकर यांच्या मालकीची होती. सुदैवाने नौकेवरील सहाही खलाशी सुखरूप बचावले. नौकेवरील जाळ्यांचे मात्र सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले.
ही नौका नव्यानेच तयार करण्यात आली होती. या नव्या बोटीची चाचपणी सुरू असताना ही दुर्घटना घडली. त्यावर ६ खलाशी होते. भाट्ये येथील खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातून ही नौका समुद्रात जात होती.
यावेळी पाण्याचा करंट बसल्याने नौका खाडीत उलटली. नौका उलटताच खलाशांनी खाडीत उड्या टाकल्या. सुरुवातीला खलाशी बचावासाठी उलट्या झालेल्या नौकेवर चढले. ही गोष्ट या परिसरात मासेमारी करणाऱ्या इतर मच्छीमारांच्या लक्षात येताच त्यांनी या खलाशांच्या बचावासाठी धाव घेतली. सुरक्षेसाठी व लाटांचा मारा कमी करण्यासाठी बुडालेल्या नौकेच्या सभोवताली इतर नौकांनी रिंगण तयार केले. प्रथम खलाशांना सुखरूप दुसऱ्या बोटीवर घेण्यात आले. यानंतर बुडालेली नौका सरळ करुन राजिवडा येथे किनाऱ्यावर आणण्यात आली.
गाळ उपशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचल्याने दरवर्षी नौका बुडण्याच्या घटना घडतात. येथे नौका बुडून अनेकदा मच्छीमार दगावले आहेत. मांडवी बंदरात साचलेला गाळ काढण्याबाबत राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छिमार संघर्ष समिती लढा देत आहे. त्यासाठी अनेकदा शासनाला निवेदने देण्यात आली आहेत. तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन गाळ उपसण्याची अनेकदा मागणी करण्यात आली आहे.मात्र त्याकडे जाणीपूर्वक शासन-प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.