( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
जिल्ह्यातील दक्षिण विभागात वंचित बहुजन आघाडी पक्षात वरिष्ठांकडून मोठ्या हालचाली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षभरापासून या दक्षिण जिल्ह्यात पक्षाचे कामकाज ठप्प असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दक्षिण जिल्हाध्यक्ष रुपेंद्र जाधव यांच्या पक्षीय कार्यपद्धतीवर कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर आहे. मात्र आता आगामी विधानसभेच्या तोंडावर जिल्हा कार्यकारणीत मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वंचितचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात लक्ष केंद्रित केले असून आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठ्या हालचाली होणार असल्याची शक्यता आहे. पक्षाचे ठप्प असलेल्या कामकाजाला गती देण्यासाठी कार्यकारणीमध्ये पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून मोठे बदल होणार असल्याची माहिती आहे. पक्ष आदेश धुडकवणाऱ्या जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. वर्षभरापासून पक्षाचे कोणतेही कामकाज केले जात नसल्याने जिल्हास्तरावरच पक्षाची मोठी हानी होत असल्याची बाब वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर अँक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. दुरावलेल्या कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठी नाराजी आहे. पक्षाचे काम सुरळीत चालावे, नाराजीत अडकलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळावी, कार्यकर्त्यांची मरगळ दूर व्हावी अशा अनेक बाबी समोर ठेवून रत्नागिरी दक्षिण विभागाच्या कार्यकारणीत बदल करण्याचा मोठा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर घेणार असल्याची माहिती मिळत आहे.