( राजापूर / तुषार पाचलकर )
महाविद्यालयीन शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या घडणीचा पाया असतो. विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात संधी खुणावत असतात. अशा संधीचे सोने करून विद्यार्थ्यांनी जिद्दीने स्वावलंबी बनण्यासाठी अविरत कष्ट घेतले पाहिजेत. त्यासाठी सतत अभ्यास केला पाहिजे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या संधीचे सोने करून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावे, असे आवाहन सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळ पाचल -रायपाटण या संस्थेचे सरचिटणीस श्री. नरेश पाचलकर यांनी केले. ते श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आयोजित स्वागत समारंभ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. येल्लुरे, माजी सरचिटणीस व संस्था सदस्य श्री. चंद्रकांत लिंगायत, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बी. टी. दाभाडे व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी यश धावडे याने आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. प्रथम वर्ष कला आणि वाणिज्यच्या विद्यार्थ्यांचे द्वितीय व तृतीय वर्ष कला आणि वाणिज्यच्या विद्यार्थ्यांनी त्यांना भेटवस्तू व फुल देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत केले. आपण दुसऱ्याला प्रोत्साहन दिले की आपल्यासाठी प्रोत्साहन देणारे अनेक लोक उभे राहतात. हेच विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात दाखवून दिले. हा उपक्रम चैतन्यदायी असून अशाच विविध उपक्रमातून आणि वाचनातून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावे, असे आवाहन संस्थेचे माजी सरचिटणीस व विद्यमान सदस्य श्री. चंद्रकांत लिंगायत यांनी केले.
यावेळी स्वाती सुर्वे, सायरा काझी, कलिका जाधव, साहिल नॉर्वेकर, गौरव नेवरेकर,प्रीतम ढवळे, बन्सी मालप,तुषार गोरुले,नेत्रा बावकर, आकांक्षा चव्हाण आदी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात शिस्त पाळावी आणि आपल्या जीवनास आकार द्यावा. आपल्या गुरुजनांच्या आज्ञेत राहून स्वतःचे ध्येय साध्य करावे व आपणाबरोबरच महाविद्यालयाचे नाव रोशन करावे, असे आवाहन आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ. एम. ए. येल्लुरे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थेचे पदाधिकारी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची पडवळ हिने तर आभार सायरा काझीने मानले.