(मुंबई)
बदलापूर अत्याचार घटनेचे वार्तांकन करणाऱ्यांना दैनिक ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीतील महिला बातमीदाराला शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी धमकी दिली आहे. ‘तू अशा बातम्या देत आहे, जणू तुझ्यावर बलात्कार झाला आहे’, अशा शब्दात माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ही धमकी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेत कोणाचीही गय केली जाणार नाही, असे सांगत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच गटाच्या पदाधिकाऱ्याने अशा संवेदनशील प्रकरणात महिला पत्रकाराला धमकी दिल्याचे त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चार वर्षांच्या मुलींवर अत्याचाराचा प्रकार 13 ते 16 ऑगस्टला घडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर 18 ऑगस्टला तिच्या कुटुंबियांनी तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेच्या निषेधासाठी बदलापुरमध्ये आज सकाळपासून पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. यानंतर आंदोलक आक्रमक होत बदलापूर रेल्वे स्थानकावर पोचले आणि ‘रेल रोको’ आंदोलन केले. त्यामुळे बदलापूर मार्गावरील सर्व रेल्वे सेवा विस्कळीत आहे. गेल्या आठ तासांपासून हे आंदोलन सुरू आहे. या घटनेची सुरवातीपासून वार्तांकन करण्यावर माध्यमांचा भर आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आंदोलनातील प्रत्येक क्षणाची माहिती पत्रकारांकडून दिली जात आहे.
या घटनेचे पहिल्यापासून वार्तांकन करणाऱ्या ‘सकाळ’च्या मुंबई बदलापूर आवृत्तीच्या महिला बातमीदाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील माजी नगराध्यक्ष तथा शहरप्रमुख वामन म्हात्रे याने धमकी दिली. तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावर बलात्कार झाला आहे, अशी भाषा वामन म्हात्रे याने महिला बातमीदाराशी बोलताना वापरली. वामन म्हात्रे याच्या या भाषेचे आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेणार
बदलापुरातील अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. यावर ते संवेदनशील देखील आहेत. घटना उघडकीस आल्यापासून आणि बदलापूरमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची ते बारकाईने माहिती घेत आहेत. ही माहिती घेण्याबरोबर ते प्रशासकीय यंत्रणेला कारवाईचे आदेश देत आहेत. मुख्यमंत्री शिंदे संवेदनशीलता दाखवत असतानाच, दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते मात्र या घटनेचे पहिल्यापासून वार्तांकन करत असलेल्या महिला बातमीदाराला रस्त्यात अडवून धमक्या देत आहेत. शिवसेनेतील नेत्याच्या या प्रकाराचे आता मुंबईत पडसाद उमटू लागले आहेत.