( जैतापूर / राजन लाड )
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील बारा गावांचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव अंजनेश्वर मंदिर कसबा मीठगवाणे येथील देव दरवर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी दशक्रोशीतील एका गावात किंवा वाडीतील मंदिराच्या भेटीसाठी श्रावण दिंडीने जातो. ही परंपरा मागील पन्नास वर्षानंतर अधिक काळापासून सुरू असल्याचे जाणकार सांगतात. श्री देव अंजनेश्वराचे निशान घेऊन विश्वस्त, मानकरी भाविक, ग्रामस्थ ढोल ताशांच्या गजरात दरवर्षी परिसरातील एका गावातील मंदिराच्या भेटीसाठी जात असतात. यावर्षी जांभलवाडीतील श्री देव ब्राह्मण देवाच्या भेटीसाठी श्रावण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी साडेआठच्या सुमारास वाजत गाजत ही श्रावण दिंडी श्री देव म्हणजे अंजनेश्वर घाटी, चाफे स्टॉप, चिरेखन फाटा या मार्गाने जांभलवाडी येथे दाखल झाली. जांभलवाडीच्या सीमेवर ग्रामस्थांनी या श्रावण दिंडीचे स्वागत केले. तर चिरेखन स्टॉप येथे शिरवडकर बंधूनी सरबत वाटत या श्रावण दिंडीचे स्वागत केले. दिंडी श्री देव ब्राह्मण देवाच्या मंदिरात पोहोचल्यानंतर ओम नमः शिवाय चा गजर करत श्री देव अंजनेश्वर आणि श्री देव ब्राह्मण देव भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. जांभलवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्रावण दिंडीतील भाविकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. अल्पोपहारही देण्यात आला. यावेळी देव अंजनेश्वर देवस्थानच्या वतीने श्री देव ब्राह्मण देव मंदिराला भेटवस्तू देण्यात आल्या, तर ब्राह्मण देव मंदिराकडूनही श्री देव अंजनेश्वर मंदिराला भेट वस्तू देण्यात आल्या.
आज पावसाने पूर्णतः दडी मारल्यामुळे रखरखत्या उन्हात देखील भाविकांच्या उत्साहात आणि आनंदात हा श्रावण दिंडी सोहळा संपन्न झाला. श्रावण दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे श्री देव अंजनेश्वर ट्रस्टच्या वतीने विश्वस्त डॉ. श्री. मिलिंद देसाई यांनी स्वागत केले तर जांभलवाडी ग्रामस्थांच्या वतीनेही सर्वांचे स्वागत करण्यात आले.