(रत्नागिरी)
कोकण रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. भारत-नेपाळमधील दळणवळण यंत्रणा सक्षम बनवतानाच व्यापार आणि वाणिज्य संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे लिंक तयार करण्याची जबाबदारी कोकण रेल्वेला मिळाली आहे. जयनगर (बिहार – भारत) – कुर्था (नेपाळ) या मार्गावर रेल्वे सेवा सुरु केली जाणार असून दोन डेमु ट्रेन संच कोकण रेल्वे नेपाळला प्रदान करणार आहे. या प्रकल्पाच्या कामाचा नुकताच आरंभ झाला असून पुढील वर्षभर कोकण रेल्वेच्या मार्गदर्शनाखाली नेपाळ रेल्वे कंपनी काम करणार आहे.
जयनगर-कुर्था विभागातील रेल्वे सेवा आणि रेल्वे प्रणालीचे संचालन आणि देखभालीसाठी नेपाळ सरकारने नेपाळ रेल्वे कंपनी लिमिटेडची स्थापना केली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गदर्शनाखाली नेपाळ रेल्वे कंपनी जयनगर-कुर्था या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करत आहे. भारताचे पंतप्रधान आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या आदेशानुसार कोकण रेल्वेमार्फत नेपाळ रेल्वे कंपनीला दोन डेमु संच (एका संचात पाच बोगी) वितरित केले आहेत. त्याचे उद्घाटन 2 एप्रिलला झाले असून जयनगर (भारत) आणि कुर्था (नेपाळ) मधील सीमा रेल्वेने लिंक केली जाणार आहे.
सुरुवातीच्या प्रवासी सेवा दोन ट्रेन संचांसह सुरू केल्या जातील. ज्यांचा पुरवठा नेपाळ सरकारने प्रदान केलेल्या निधीतून कोकण रेल्वेने करणार आहे. या मार्गावर चालवण्यात येणारे ‘डेमु’ रेक चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बनविण्यात आले आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय ध्वजावर आधारीत रंगसंगतीला या ट्रेन सेटला दिली आहे. नेपाळ रेल्वे कंपनीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला एक वर्षाच्या कालावधीत रेल्वे चालवण्यासह देखभालीसाठी नियुक्त केले आहे. या कराराचा एक भाग म्हणून, कोकण रेल्वेमार्फत गाडीचे संचालन आणि देखभाल केली जाणार आहे.
नेपाळ रेल्वेच्या कर्मचार्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 26 तज्ञ मनुष्यबळ आणि किमान उपकरणे कोकण रेल्वे पुरवणार आहे. रेल्वे ऑपरेशन्ससाठी मूलभूत प्रणाली तयार करुन रुळ आणि सिग्नलिंगची देखभालीसाठी तांत्रिक सहाय्य कोकण रेल्वे करणार आहे. नेपाळमध्ये मजबूत रेल्वे व्यवस्था तयार करण्यासासाठी भारत आणि नेपाळ सरकार यांच्या पाठिंब्याने कोकण रेल्वे नेपाळ रेल्वे कंपनीला सहाय्य करणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध दृढ होण्यास मदत होईल. रेल्वे आणि भौतिक पायाभूत सुविधा मंत्रालयासोबत काम करण्याचे कोकण रेल्वेला विशेषाधिकार प्रदान करण्यात आले आहेत.