(जळगाव)
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाच्या परिसरातील केटी वेअर धरण परिसरात खेळायला गेलेल्या चार सख्ख्या बहीण- भाऊंचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे. भाऊ आणि बहीणीच्या अतूट नात्याच्या या सणाच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाच्या परिसरातील नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या परिसरात खेळण्यासाठी गेलेल्या चार सख्ख्या बहीण- भाऊंचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रोशनी सुभाषसिंग आर्य (वय ९), शिवांजली सुभाषसिंग आर्य (वय ८), आर्यन सुभाषसिंग आर्य (वय ३), आराध्या सुभाषसिंग आर्य (वय ४, सर्व रा. दुगणी तहसील ता. सेंधवा जिल्हा बडवणी) अशी बंधाऱ्यात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नावे आहे. या घटनेमुळे गायवर शोककळा पसरली आहे.
धरणाच्या पाण्याजवळ गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. चारही सख्खे बहीणभाऊ क्षणार्धात एकमेकांसोबत बुडाले. ग्रामस्थांना समजताच त्यांनी धावाधाव केली. काहींनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविले. पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पावरा परिवाराचा मन हेलावणारा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे पावरा कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे. घटनेबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरा नोंद करण्याचे काम सुरु होते.
एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चारही सख्खे बहीणभाऊ बुडाले. ग्रामस्थ व पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर सर्वांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. यावेळी कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.