(रत्नागिरी / जिमाका)
छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी..जय शिवाजी.. हर हर महादेव..! च्या जयघोषात, हजारो चिपळूणकर शिवप्रेमींच्या साक्षीने शिवसृष्टीचे लोकार्पण झाले. पालकमंत्री उदय सामंत यांनी कळ दाबताच छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यावरील पडदा खाली सरकला..अन् एकच जयघोष झाला..आसमंत दिव्यांनी अन् आतषबाजीने तेजाळून गेले. चिपळूण येथे रविवारी झालेल्या शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याला खासदार रविंद्र वायकर, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, वैभव खेडेकर आदींसह शिवप्रेमींची मोठी उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे क्षण असतात. ३५० वा राज्याभिषेक सोहळा होत असताना मी रायगडचा पालकमंत्री होतो, हा माझ्या दृष्टीने भाग्याचा क्षण आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्यातला सगळ्यात उंच पुतळा रत्नागिरीत उभा करु शकलो हा देखील माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. कोकणातील सर्वात मोठी शिवसृष्टी रत्नदुर्ग किल्ल्याजवळ शासनाच्या माध्यमातून उभारतोय हा देखील माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. ५० वर्षापासूनचे चिपळूणकरांचे स्वप्न आज साकार होतेय, हे देखील माझे भाग्य समजतो.
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्व पक्ष एकत्र येवू शकतात, हा संदेश चिपळूणवासियांनी केवळ राज्याला नाही तर, देशाला आज दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो समतेचा राजमार्ग आपल्यासाठी आखून ठेवलेला आहे, त्याचा आदर्श आणि अनुकरण करण्याचा प्रयत्न भविष्याच्या कालावधीमध्ये या पुतळ्याकडे पाहून करावा, असेही पालकमंत्री म्हणाले. यानंतर पालकमंत्री श्री सामंत यांनी राजमुद्रेला पुष्पहार वाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. खासदार श्री. वायकर, आमदार श्री. निकम आणि आमदार. श्री. जाधव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.