(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथील शिवसेना उबाठा गटाचे आत्माराम सुतार यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हंटले आहे, पाचल विभागातील श्री.आत्माराम सुतार यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या हकालपट्टीने राजापुरात खळबळ उडाली आहे. यामुळे पक्षाविरोधी कारवाई करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
आत्माराम सुतार हे या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात प्रवेश केला होता. शिवसेनेत असताना पक्षाने त्यांच्या पत्नीला राजापूर तालुका पंचायत समितीच्या उपसभापतीपदी नेमणूक केली होती. तरीही सुतार हे पक्ष विरोधी काम करत असल्याची चर्चा होती. अखेरीस याची वरिष्ठ स्तरावरून दखल घेण्यात आली आणि त्यांची हकालपट्टी करण्याचे आदेश देण्यात आले.