(राजापूर / तुषार पाचलकर)
फॅमिली डॉक्टरनेच तपासणीसाठी आलेल्या युवतीचा विनयभंग केल्याची घटना राजापूरात घडली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी डॉ. रंगराव संभाजी पाटील (६९) रा. धोपेश्वर घाटी राजापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बुधवार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना घडली आहे. तशी माहिती राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी पत्रकारांना दिली आहे.
एका डॉक्टरने केलेल्या या घृणास्पद प्रकारामुळे राजापुरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर या घटनेबाबात पिडित युवतीच्या घरी व गावात माहिती कळताच ग्रामस्थांनी राजापुरात येत त्या डॉक्टरला चांगलाच चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी त्या पिडित युवतीने राजापूर पोलीसांत फिर्याद दिली आहे. सदरचा डॉक्टर हा या पिडित युवतीचा फॅमिली डॉक्टर आहे. या युवतीच्या घरातील सर्वजण या डॉक्टरचे नियमित पेशंट आहेत. या पिडित युवतीला सर्दी व ताप येत होता. यासाठी ती मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी या डॉक्टरकडे तपासणीसाठी आली होती. मात्र तरीही तीला बरे न वाटल्याने व अशक्तपणा असल्याने ती पुन्हा बुधवारी सायंकाळी ६ वाजता आपल्या लहान भावासह या डॉक्टरकडे आली. यावेळी पुढे असलेल्या दोन पेशंटना तपासून ते पेशंट गेल्यावर या डॉक्टरने या पिडित युवतीला तपासले. तापामुळे अशक्तपणा आल्याने तुला सलाईन लावण्याची आवश्यकता असल्याचे सांगून तीला बाहेरच्या रूममध्ये पेशंटना अॅडमिट करण्यासाठी असलेल्या बेडवर झोपावयास सांगितले व तीच्या भावाला सलाईनमधून देण्यासाठी लागणारे इंजक्शन प्रिस्क्रीपशनवर लिहून देत ते बाजारपेठेतुन मेडिकल मधून आणण्यास सांगून बाहेर पाठविले.
यानंतर या पिडित युवतीला सलाईन लावल्यावर या डॉक्टरने तीच्याशी अश्लील वर्तन केले. तीच्या शरीराशी घृणास्पदरित्या स्पर्श केला. तर दुपारी जेवणाच्या सुट्टीत तु रोज इथे ये असे सांगितल्याचे या पिडित युवतीने फिर्यादीत नमुद केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. सलाईन संपल्यावर ही युवती भावासह घरी गेली व तीने हा घडला प्रकार आपल्या आईला सांगितला.
त्यानंतर तिच्या गावातील ग्रामस्थांनी या डॉक्टरच्या क्लीनिकवर धडक देत त्याला चांगलाच चोप दिला व राजापूर पोलीसांच्या ताब्यात दिल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
या प्रकरणी त्या पिडित युवतीच्या फिर्यादीवरून पोलीसांनी डॉ. रंगराव पाटील याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७५ (१) १ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी व पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अधिकारी हेडकाँस्टेबर हर्षदा चव्हाण अधिक तपास करत आहेत.
या प्रकरणी पोलीसांनी तपास सुरू केला असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. तर सदर पिडित युवतीचा महिला अधिकारी, महिला पोलीस व महिला सरपंच यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा जबाब नोंदविण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले. तर संबधित संशयीत आरोपीचे वय हे ६५ च्या वर असल्याने अटक न करता त्याला वेळोवेळी पोलीस तपास व न्यायालयीन प्रक्रियेसाठी उपस्थित रहाण्याची सक्त सुचनेची नोटीस देण्यात आल्याचेही पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.