(रत्नागिरी)
९ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीची ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत.
१५ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेल्या जागेचीही तोडफोड करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर, विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो, असे डॉ अतुल ढगे, अध्यक्ष, आय एम ए रत्नागिरी यांनी म्हटले आहे.
या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात राष्ट्रीय इंडियन मेडिकल असोसिएशनने १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ पर्यंत २४ तासांच्या सेवा बंदीचा आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने आय एम ए रत्नागिरी तर्फे अत्यावश्यक सेवा वगळता इतर वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा सुरू राहतील. पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवेसाठी रुग्ण आपल्या जवळील डॉक्टरांकडे किंवा परकार हॉस्पिटल, चिंतामणी हॉस्पिटल, चिरायू हॉस्पिटल किंवा रामनाथ हॉस्पिटल येथे संपर्क करू शकतात. सेवा बंद करण्याचा हेतू रुग्णाची गैरसोय व्हावी हे नसून व्यवस्थेचे या घटनेकडे लक्ष वेधणे व योग्य ते कारवाई व्हावी असे आहे त्यामुळे आम्ही रुग्णांची दिलगिरी व्यक्त करतो व त्यांच्या कडून सहकार्याची अपेक्षा करतो असे मत आय एम ए रत्नागिरी चे अध्यक्ष डॉ अतुल ढगे यांनी व्यक्त केले.
इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व देशवासीयांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांस न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती करत आहे आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करुन कायद्या बदल करण्याचा आग्रह केंद्रशासनाकडे करत आहे, असे डॉ अतुल ढगे यांनी कळविले आहे.