(दापोली)
शेअर मार्केटमधून दामदुपटीचे आमिष दाखवत लोकांकडून लाखो रुपये गोळा करून पळून गेलेल्या संशयित तरुणाला दापोली पोलिसांनी अखेर बंगळुरूमधून अटक केली आहे. त्याला घेऊन पोलिस सोमवारी दापोलीत हजर झाले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हर्ष कातळकर, असे या संशयित तरुणाचे नाव असून, लोकांनी गुंतवलेल्या पैशांचे त्याने काय केले, याचा तपास आता प्राधान्याने केला जाणार आहे.
शहरालगतच्या गावात एका तरुणाने शेअर मार्केटमधील ट्रेडिंगच्या नावाने थाटामाटात व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीच्या काळात अनेक लोकांना दामदुपटीचे आमीष दाखवले आणि तसा परतावाही मिळवून दिला. त्यामुळे अनेकजण त्याच्या आमिषाला बळी पडले. काही सरकारी कर्मचाऱ्यांनीही त्याच्याकडे काही लाखो रुपये गुंतवले. गुंतवणूकदार आणि गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर मात्र काही दिवसांनी लोकांना ठरल्याप्रमाणे रक्कम देणे बंद झाले. त्यानंतर संबंधित संशयित तरुणाने लोकांना आमिष दाखवून परत रक्कम गुंतवण्यास सांगितले. दामदुपटीच्या आशेने काही लोकांनी परत जादा रक्कम गुंतवली. त्यानंतर मात्र अचानक आपल्या कार्यालयाला टाळे ठोकून तो तरुण गायब झाला.
अनेक महिने हा तरुण फरारी होता. पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर तो बंगळुरूमध्ये असल्याची माहिती मिळाली आणि पोलिस पथकाने तेथे जाऊन त्याला अटक केली आहे. न्यायालयाने सात दिवसांसाठी त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.