( जैतापूर / वार्ताहर )
न्यू इंग्लिश स्कूल,जैतापूर ता. राजापूर या माध्यमिक शाळेमध्ये एस.एस. सी.बॅच मार्च 1990 च्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना दफ्तर व सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. सुरवातीला या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणातील “श्री” च्या प्रतिमेचे शुभ आशिर्वाद घेत कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्व माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नारे मॅडम यांनी गुलाबपुष्प देत स्वागत केले.
प्रथमतः या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नारे मॅडम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या नंतर याच बॅच च्या माजी विद्यार्थिनी श्रीमती मनिषा हरचकर यांचा धाऊलवल्ली या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पदी विराजमान झाल्या बद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बॅच च्या जैतापूरच्या उपसरपंच पदी विराजमान झालेल्या सौ.मिनल मंगेश मांजरेकर यांचा जैतापूरचे सरपंच श्री.राजप्रसाद राऊत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी जैतापूर गावाचे विद्यमान सरपंच व शाळेच्या शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष, श्री.राजप्रसाद राऊत, उपाध्यक्ष सौ. प्रेक्षा देवळेकर, सदस्या सौ.प्रियांका नार्वेकर मॅडम माजी उपाध्यक्ष श्री.दिगंबर शिवगण व शिक्षक पालक संघाचे बहुसंख्य पालक सदस्य तथा शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या वेळी या बॅच चे श्री.महेंद्र शिवलकर,संतोष के. लासे, श्री.सुनिलदत्त जाधव,संतोष धो. लासे,संजय देवरुखकर, संतोष भोपळे, संदिप मांजरेकर, सौ.मि नल मांजरेकर, श्रीम. मनिषा हरचकर हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या बॅच मधील श्री.महेंद्र शिवलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या सर्व स्टाफ, पालक शिक्षक संघ, उपस्थित पालक वर्गाचे आभार मानले. त्याचबरोबर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन केले. समारोपाच्या भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नारे मॅडम यांनी या बॅच च्या स्तुत्य उपक्रमाबाबत कौतुक करत आभार मानले व अश्याच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली व शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचे कला शिक्षक श्री. कुणकवळेकर यांनी केले. सदर बॅचच्या वतीने शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या भौतिक सुविधांसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.