(गुहागर)
नुकत्याच सुरू झालेल्या श्रावण महिन्यांच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवार दि. ३ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस होता. या दिवशी संध्याकाळी साधारणतः ७.३० वा. उमराठ बौद्धवाडीतील प्रशांत कदम (ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी) यांच्या घराजवळ घराशेजारीच असलेल्या जंगलमय आडीतून एक साधारणतः १५ दिवसांच्या आतील छोटेसे बिबट्या वाघाचे पिल्लू ओरडत असताना प्रशांत कदम यांना दिसले. ते पाऊसामुळे गारठले होते व घराशेजारीच असलेल्या जुन्या कौलांच्या ढिगाऱ्याखाली लपले होते.
लहान पिल्लू बहुधा बिबट्या वाघीण, तिच्या पिल्लांना दुसऱ्या जागी नेत असताना मुसळधार पावसामुळे चुकले गेले असावे आणि आईसाठी ओरडत घाबरून आश्रयाला आले असावे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्या दिवशी रात्री भरपूर पाऊस आणि काळोख असल्यामुळे प्रशांत कदम, त्यांचे भाऊबंद आणि वाडीतील मंडळींनी त्या पिल्लाला अधिक त्रास न देता रात्री त्याची आई वाघीण शोधत येऊन त्याला घेऊन जाईल या हेतुने तिथेच राहू दिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा पाहिले तर ते पिल्लू तिथेच होते. ते घाबरलेले होतेच, परंतू पावसात भिजल्यामुळे गारठलेले होते. रविवारी सकाळी मात्र त्याला प्रशांत कदम आणि भाऊबंदांनी उचलून घरी आणले. कपड्याने स्वच्छ पुसून लहान मुलांच्या दुध बाॅटलने दुध पाजले. त्या पिल्लाला थोडी तरतरी आली आणि सर्वत्र फरू लागले. त्याला छोट्या बास्केटमध्ये उबदार कपड्यात ठेवून देखभाल चालू केली.
त्यानंतर रविवारी दि. ४.८.२०२४ रोजी सकाळीच गुहागर वनविभाग अधिकारी यांना प्रशांत कदम आणि उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानुसार सोमवार दि. ५.८.२०२४ रोजी वनविभाग अधिकारी येऊन त्या पिल्लाला घेऊन गेले. परंतु ते पिल्लू फारच छोटे असल्यामुळे त्याची देखभाल करण्यासाठी अडचणी येत होत्या. वनविभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन त्या बछड्याला आई वाघीण पुन्हा घेऊन जाईल अशा अंदाजाने मंगळवारी संध्याकाळी पुन्हा वनविभाग अधिकाऱ्यांची टिम त्या बछड्याला घेऊन घटनास्थळी आले.
संध्याकाळी अंधार होण्यापूर्वी त्या बछड्याला ते जिथून आले त्या रहदारीच्या वाटेवर छोट्या उघडता येईल अशा बंद बास्केट पिंजऱ्यात त्या बछड्याला ठेऊन कृती काय होते ते पाहण्यासाठी तेथे झाडांच्या सहाय्याने तीन कॅमेरे लावण्यात आले. त्यानंतर नेमके काय घडते हे पाहण्यासाठी दोन वनअधिकारी रात्रभर प्रशांत कदम यांच्या घरी राहून पाळत ठेवत होते. अशी कृती मंगळवार आणि बुधवार या दोन्हीं दिवसी केल्यानंतर सुद्धा वाघीण येऊन घेऊन जात नाही, हे पाहिल्यावर वनअधिकाऱ्यांच्या टिमने गुरूवार दि. ८.८.२०२४ रोजी त्या बछड्याची पुढील देखभाल करण्यासाठी मुंबई बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) येथे रवानगी करण्यात आली.
बिबट्याच्या बछड्याला जिवदान दिल्याबद्दल उमराठ बौद्धवाडीतील प्रशांत कदम परिवाराचे, भाऊबंदांचे तसेच या मोहिमेत उत्तम सहकार्य दिल्याबद्दल सहभागी वनविभागाच्या सर्व वनअधिकारी टिमचे ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.