(रत्नागिरी)
सोशल मीडियावर ओळख निर्माण झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पंजाब, चंडीगड येथून एका तरुणीला रत्नागिरीत बोलावून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, शहर पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर मोठा अनर्थ टळला. रत्नागिरीतील काही तरुणांनी मिळून तिची फसवणूक करत तिला येथे बोलावून घेतले होते. या तरुणांचा पोलिसांकडून आता शोध सुरू आहे.
पंजाब चंडीगड येथील ही तरुणी गुरुवारी सकाळी ८ वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आली होती. त्यानंतर तेथील पोलिस चौकीसमोरील मोबाइल दुकानात नोकरी मागण्यासाठी ती गेली होती. तेथील मालकाने तिची विचारपूस केल्यानंतर तिने आपली रत्नागिरीतील तीन ते चार मुलांशी सोशल मीडियावर ओळख झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यातील एकाने तिला लग्नाचे आमिष दाखवल्यानंतर तब्बल एक वर्ष व्हिडीओ कॉल आणि सोशल मीडियावर त्याच्याशी संपर्कात होती. काही दिवसांपूर्वी त्या तरुणाने त्या तरुणीला पैसे पाठवून घरातून रत्नागिरीला पळून येण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ही तरुणी रत्नागिरीत आली होती.
रेल्वे स्थानकाबाहेरील मोबाइल दकानाच्या मालकाने तिच्याकडून माहिती घेतली असता सर्व प्रकार उघडकीला आला. त्यांनी तिला रेल्वे स्थानकातील पोलिस चौकीत नेऊन सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकाशी संपर्क साधून माहिती दिली. शहर पोलिसांनी त्या तरुणीची ‘सखी’ महिला केंद्रात रवानगी केली. पोलिसांनी त्या तरुणीला रत्नागिरीत बोलावणाऱ्या तरुणांचा शोध तत्काळ सुरू केला आहे.