(संगमेश्वर)
तालुक्यातील आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडाची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. गोवा-मुंबई महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात या कुंडाच्या सौंदर्याला ओहोटी लागली. कुंडाच्या जवळूनच उड्डाणपुलाचा रस्ता गेल्याने हे कुंड नवीन माणसाला आता शोधावे लागते. कुंडाकडे जाण्यासाठीच्या पायऱ्या ठिकठिकाणी निखळून पडल्या असून, त्यावरील रेलिंग गायब झाले आहे. कुंडातील पाणी ज्या नाल्यात वाहून जाते तो नाला गाळाने व झुडपांनी भरल्याने पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी नाल्यातील पाणीच उलट दिशेने कुंडात येत आहे. त्यामुळे एकेकाळी कुंडातील गंधकमिश्रित गरम पाण्याची जागा आता माती मिश्रित दूषित थंड पाण्याने घेतली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री कै. मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील युती शासनाने या कुंडाना क वर्ग पर्यटन स्थळांचा दर्जा दिला होता. त्यावेळी अंदाजे चाळीस लाख रूपये खर्चुन कुंडाकडे जाण्यासाठी पायऱ्या, रेलिंग, महिला व पुरूषांकरिता कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोली, कुंडाच्या वरील बाजूस पत्र्याचे छप्पर आदी कामे केली होती. त्यानंतर या स्थळाच्या दुरुस्तीकडे पर्यटन खात्याने लक्ष दिले नाही. येथील झऱ्यांना कुंडाच्या आकारात बांधून त्यात स्नान अथवा हात पाय धुण्याची सोय केलेली आहे. या झऱ्यातून बारमाही गरम पाणी वाहते. झऱ्यातील पाण्यात गंधकाचे प्रमाण अधिक असल्याने या पाण्यात स्नान केल्याने त्वचेचे आजार बरे होतात, असे सांगितले जाते. त्यामुळे अनेक पर्यटक निसर्गाचा हा चमत्कार पहाण्यासाठी वा अनुभवण्यासाठी या कुंडाना आवर्जून भेट देतात. खासगी वाहनचालक आंघोळीसाठी मुद्दाम वाहने थांबवून कुंडातील गरम पाण्याने आंघोळ करत आपला शीण घालवतात.
या कुंडामळे आरवलीला स्वतंत्र ओळख मिळाल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.कुंडाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर हा नैसर्गिक ठेवा नष्ट होण्याची भीती पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पर्यटकांची कुंडाकडे पाठ
कुंडाच्यासभोवती गवत व झुडपे वाढल्याने कुंडाना बकाल स्वरूप आले आहे. त्यामुळे पर्यटकांनी या स्थळाकडे पाठ फिरवली आहे. या स्थळाचे सौदर्य अबाधित राखण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा हे पर्यटनस्थळ इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही.