( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
जिल्ह्यातील संगमेश्वरमधील तूरळ येथील जिल्हा परिषदेच्या गळक्या शाळेत मुलांचा प्रश्न अद्याप ही सुटलेला नाही. बचत गटाच्या हॉलमध्ये मुलांचे वर्ग भरत आहे. या शाळेचे भीषण वास्तव काही दिवसांपूर्वी ‘रत्नागिरी 24 न्युज’ने सविस्तर बातमी प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला खडबडून जाग आली. शाळेच्या दुरुस्तीबाबत धूळखात पडलेल्या प्रस्तावावर शिक्षण विभागाकडून तातडीने आर्थिक तरतूद करण्यात आली. मात्र दिलेल्या रक्कमेत साधी पत्र्याची शेड देखील उभारता येणार नाही अशी खंत आता ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या शाळेच्या दुरुस्तीबाबत गुरुवारी (दिनांक 8 ऑगस्ट 2024 ) सरपंच सहदेव सुवरे यांच्या माध्यमातून गावातील सर्व ग्रामस्थ, व्यवस्थापन कमिटीचे सदस्य आणि शाळेचे शिक्षक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांकडे अशाच प्रकारे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दुरुस्तीअभावी शाळा बंद पाडण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला असेल तर मुलांनी शिकावे तरी कुठे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मुलांच्या भवितव्याचा विचार करायला शिक्षण विभाग कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्ती तरी पत्र्याची शेड उभारण्याच्या दृष्टीने आर्थिक तरतूद करणे आवश्यक होते. मात्र तुटपुंज्या स्वरूपात आर्थिक रक्कम देऊन शिक्षण विभाग शाळेशी देणंघेणं नसल्यासारखे वागत आहे. शिक्षण विभागाच्या अशा कारभारामुळे आगीतून निघून फुफाट्यात पडणे अशी स्थिती निर्माण झाली आहे.
या शाळेची दहा वर्षांपासून दुरुस्तीच झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येऊन सुद्धा शिक्षण विभागाचे अधिकारी अशा शाळांकडे दुर्लक्ष का करतात? असा प्रश्नच ग्रामस्थांकडून शिक्षण विभागाला विचारला जात आहे. लहान मुलांना बसण्यास जागा नसल्याची गंभीर स्थिती असताना ही दुर्लक्षित होत असेल तर उपोषणाशिवाय पर्याय नाही असे मत काही ग्रामस्थांनी बैठकीत मांडले. या बैठकीत गावातील सर्व ग्रामस्थ, व्यवस्थापन कमिटीचे सदस्य आणि सर्व शिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते.
अशी आहे शाळेची भीषण स्थिती…
शाळेच्या पहिल्या इमारतीतील अध्यापनासाठी वापरत असलेल्या तीन वर्गखोल्याचा स्लॅब पूर्ण गळक्या स्थितित आहे. तर दुसऱ्या इमारतीची वरची खोली पूर्णपणे गळत आहे. छताचे प्लॅस्टर, दरवाजे, खिडक्या बदलने आवश्यक आहे. वरील ३ वर्गखोल्या विध्यार्थ्यांना बसण्यायोग्य नाहीत. तीन वर्गखोल्यांची पत्रा शेड व त्यातील एका वर्गखोलीची वरील दुरुस्ती होणे आवश्यक आहे.