(रत्नागिरी)
शहरानजीकच्या भाट्ये येथील एका विद्यालयामागे तरुणाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ऋषिकेश विलास पवार (२५, रा. कोळंबे बागवाडी, रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे.
मंगळवारी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास ऋषिकेश आणि त्याचा भाऊ ऋत्विक हे दुचाकीवरून फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यानंतर ऋषिकेशने ऋत्विकला पुलाजवळ सोडले व तो दुचाकीवरून रत्नागिरीच्या दिशेने गेला. काही वेळाने ऋत्विकने ऋषिकेशला फोन लावला. परंतु, तो फोन उचलत नव्हता. म्हणून ऋत्विक त्याचा मित्र प्रणय पवारला घेऊन ऋषिकेशचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते दोघेही भाट्ये येथील एका विद्यालयाच्या मागील बाजूला गेले असता, त्यांना एका झाडाच्या फांदीला ऋषिकेश पंचाने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
दोघांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास शहर पोलिस स्थानकाचे हवालदार बेंदरकर करत आहेत. मात्र ऋषिकेशने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे अजून पुढे आलेले नाही.