(देवरुख)
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ५७ व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाची प्राथमिक फेरी नुकतीच एस पी हेगशेटये महाविद्यालय रत्नागिरी येथे पार पडली. जिल्ह्यातील चार तालुक्यामधील १७ महाविद्यालयातील जवळपास ५०० विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या आंबव (देवरुख ) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील चार विद्यार्थ्यांनी इंग्रजी वक्तृत्व, पोस्टर मेकिंग, स्टोरी टेलिंग तसेच कार्टूनिंग प्रकारामध्ये सुयश संपादन केले आहे.
या महाविद्यालयाच्या एकूण २५ विद्यार्थ्यानी या दक्षिण रत्नागिरी साठी झालेल्या झोनल राउंडमध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये सुबोध मुनीश्वर याने कार्टूनिंग व पोस्टर मेकिंग या दोन स्पर्धांमध्ये यश मिळविले असून त्याने अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकाचे व उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले आहे. त्याचबरोबर आश्लेषा जाधव हिने इंग्रजी वक्तृत्व ग्रुप बी स्पर्धेमध्ये तर विशालिनी अंकम हिने स्टोरी टेलिंग ग्रुप बी मध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले आहे.
या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. गणेश जागुष्टे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. श्री. रविंद्र माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, उपाध्यक्ष श्री. मनोहर सुर्वे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.