‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे…’ या काव्यपंक्तीचे सूर उमटू लागले आहेत. सर्वांना हव्या हव्याशा वाटणार्या या मनभावन श्रावणात निसर्ग आणि माणूस यांची खूप जवळीक होते.जणू निसर्गाची लय आपल्या जगण्याला एक गाणे प्रदान करत आहे.
‘क्षणात येते सरसर क्षणात फिरूनी ऊन पडे’ या शब्दांचे सूर श्रावण रंगात बुडबुडलेले ,सुगंधात भिजलेले, वारा च्या लहरीवर तरळणारे, सोनेरी उन्हात चमकणारे श्रावणातले सण, व्रत जगण्याला बळ देतात, श्रद्धा देतात, त्याहूनही महत्त्वाचे वाटते श्रावणाची आवाहकता, सृजनाचा मातीतून वर येण्याचा मंत्र देणारी श्रावणातील ऊन पाऊस जीवनातल्या सुखदुःखाची चव घ्यायला शिकवणारा आणि गगनाशी धरणीचा दुवा जोडणारा हा मनभावन श्रावण! मातीत रूजून आकाशझेपेचे स्वप्न देणारा हा श्रावण रिमझिम बरसण्यातून जगण्याची स्वप्न पकडायला जणू सांगत आहे.
प्रखर उन्हाळ्यातल्या खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर वर्षा ॠतूचे आगमन होते आणि त्या पहिल्या सरीत तगमगणारे सृष्टीचे शांतवन होते. तिला सृजनाचे आश्वासन मिळत सर्वत्र त्या पावसाचं मनापासून स्वागत होते. जोरकस आषाढधारा स्थिरचराला झोडपून काढतात. जणू सगळीकडे एकच ताल,एकच नाद ! आभाळातून ओतणारे पावसाचा घनगूढ आवाज सगळ वातावरण धुंद झालेल असत. बंद दरवाज्याची भयभीत घर,पंखा च्या पांघरुणात गुडूप बसलेले पक्षी, चिंब चिंब भिजलेली अबोल झाडे आणि पाण्याबरोबर वाहणारे रस्ते ! जिकडे तिकडे पाणी आणि अंधार याचचं केवळ साम्राज्य असलेल्या अशा अनेक दिवसांनंतर अचानक एखाद्या सुप्रभाती स्वच्छ उजाडत दमलेला पाऊस जणू थोडी विश्रांती घेतो. सोनेरी सूर्यकिरण उंबरात सोडतात. पानापानातून श्रावण डोकावतोय आणि म्हणतोय मी आलो आहे.जरा अंगणात येऊन पहावं तर सगळीकडे नुसती हिरव्या रंगाची मिरास. तांबूस हिरवा, साधा हिरवा, गर्भ रेशमी हिरवा,काळसर हिरवा पोपटी… हिरव्या रंगाच्या विविध छटांची निसर्गातील हि श्रीमंती पाहिली कि वाटतं एकाच रंगात एवढी नेत्रसुखद रंगसंगती अस मॅचिंग सर्वत्र पसरलेले .. दगडावर पाय पडला कि पाय सरकणारं शेवाळही याचवेळी नयनरम्य दिसते.
‘श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीमधारा’ असे म्हणतात. तेव्हा श्रावणसरीचा तलम हळूवार रेशीम स्पर्श जणू त्यांना जाणवलेलाच असतो. श्रावणात ऊन स्वच्छ पांढर नाही तर ते सोनेरी वरपीचं असत. हा पावसाच्या रेशीम लडीचा जसा श्रावण महिना, भिजल्या सोनेरी उन्हाचा जसा श्रावण महिना तसा फुलांच्या बहराचाही श्रावण महिना… आषाढात लपून ठेवलेल्या सगळ्या कुप्याच जणू श्रावणात मोकळ्या होतात. जाई-जुई, प्राजक्त, सुवर्णपुषपी, तगर, अनंत, गुलबक्षी, बकुळ, आणि सोनचाफा आदि विविध प्रकारच्या फुलांचा वेगळा पण मनसपर्शी सुवास वातावरणच सुगंधमय होऊन जातो.त्यातही श्रावण सरीत भिजून आलेला हा सुगंध तनमनावर प्रसन्नतेची शिंपण करतो.
श्रावणात सारे रंग लावण्याचा परमोत्सव म्हणजे ऊन पावसात आकाशात अवचित प्रकटणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य!अनेक कवींना त्याने मोहिनी घातली आहे. अनेक रूपात त्यांना ते दिसत आहे.श्रावणातल्या निसर्गातील भरलेपणाबरोबर बहराबरोबर निरनिराळे सण समारंभ, व्रतनेम श्रावण महिन्यात श्रावणातील सोमवार, शनिवार उपवास लोक मोठया आनंदाने करतात.तसेच या महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, मंगळागौरी ,पिठोरी अमावस्या, पोळा, सत्यनारायण पूजा,इत्यादी सण येतात. त्यातील नागपंचमी हा सण फार मोठा महत्त्वाचा आहे.
पिठोरी अमावस्या हे व्रत फक्त सुवासिनी स्त्रियांचे आहे. या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात. घरातील मुलाला अगर मुलीला खीर पुरीचे जेवण देतात. चौसष्ट योगिनीं च्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. पुरणपोळी खांद्यावर मागे नेत अतीत कोण? असा प्रश्न विचारतात. मुलाचे नाव घेऊन या प्रश्नाचे उत्तर देतात. अशा रितीने व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायुष्य पुत्र होतात.
पोळा या सणाच्या दिवशी शेतकरी बैलांना सजवून पुरणपोळीचे जेवण करून ते बैलांना खाऊ घालतात. श्रावण महिन्यात बहुतेक लोक सत्यनारायणाची पूजा करतात. पूजेनंतर कथा श्रवण, आरती, शेवटी तीर्थप्रसाद दाखवितात. अशा प्रकारे श्रावण महिन्यातील आनंददायी सण माणसाला मनोमन सुखावून जातात.
प्रासंगिक लेख
– श्री.चंद्रशेखर अनंत पेटकर सर
मेर्वी