(संगमेश्वर)
निसर्ग आणि गणेशोत्सव हे वेगळेच नाते आहे. आपणा सर्वांनाच आता गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची प्रथा ही कोकणात वाडवडिलांपासून सुरु आहे. ज्या निसर्गातून बाप्पांची मूर्ती घडविण्यासाठी आपण माती घेतो, ती माती निसर्गालाच समर्पित केली पाहिजे. यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे. काळाची ही गरज ओळखून अनेक पर्यावरणप्रेमी निसर्ग संवर्धनासाठी पुढे सरसाले आहेत. पूर्वी हाताने काढलेल्या गणेशमूर्ती आपण वापरत असू, परंतु काही वर्षांपासून “प्लास्टर ऑफ पॅरिस” (POP) च्या मूर्ती वापरण्याचा प्रघात सुरू झालेला आहे आणि आता जवळपास सर्वचजण या मूर्ती सर्रास वापरतात. मात्र, निसर्ग संवर्धनासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्तींबाबत निसर्गप्रेमींच्या आवाहनाला अनेक ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
“प्लास्टर ऑफ पॅरिस” (POP) च्या मूर्ती विसर्जन केल्यानंतर कित्येक दिवस नदीमध्ये तशाच अवस्थेत दिसून येतात. सात/दहा दिवसांपासून ज्या गणेशाची आपण श्रध्दापूर्वक स्थापना, पूजाअर्चना करतो त्या गणेशाची विसर्जनानंतरची भग्नावस्थेतील मूर्ती पाहून मनाला खूपच वेदना होतात. एकप्रकारे आपल्या आस्थेचीच विटंबना होते. यासाठीचा पर्याय म्हणून आपण “शाडू” मातीच्या मूर्ती घरी आणून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया व नदीचे प्रदूषणही कमी करुया, असे आवाहन शृंगारपूरचे निसर्गप्रेमी श्री मनेश म्हस्के (पुणे) यांनी केले आहे.
आम्ही काही वर्षापासून घरी “शाडूमातीची गणेश मूर्ती” स्थापन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहोत, आपणही या वर्षापासून शाडूमातीची मूर्ती आणून नक्कीच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा कराल, अशी त्या गणरायाचरणी प्रार्थना करतो. शाडू मातीच्या मूर्तीसाठी आजच आपापल्या गावातील/शहरातील मूर्तीकारांना संपर्क करुन, आपली पर्यावरण पूरक गणेशमूर्ती नोंदणी करुन ठेवा, असे आवाहनही मनेश म्हस्के यांनी केले आहे.
शाडू माती पर्यावरणपूरक आहे, तसेच कोणत्याही घातक रसायानाचा अंश या मातीत नाही. त्यामुळे या मूर्तीचे विघटन अतिशय सोप्या पध्दतीने होते. मूर्ती विसर्जनानंतर ती पूर्णपणे विरघळते व कोणताही रासायनिक वा जैविक प्रभाव जलस्त्रोतावर होत नाही. या मूर्तीमुळे जलप्रदूषण होत नाही. शाडूच्या गणपतीत वैविध्य आणतानाच कलाकुसर करण्यासही अधिक वाव असतो. पर्यावरण संवर्धनासोबतच शास्त्रानुसारही शाडूच्या मातीचे गणपती बनविणे योग्य आहे. शाडू मूर्ती वजनाला बऱ्यापैकी जड असते. आतमधून पोकळ नसते. एका साच्यात तयार झालेली नसते; परंतु मूर्तीचा ढाचा मजबूत असतो.
गणपतीची मूर्ती ही पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभुतांमध्ये विलीन झाली पाहिजे, असे शास्त्र सांगते. म्हणजेच धर्मशास्त्रानुसार, गणेशमूर्ती शाडू मातीच्या बनविणेच आवश्यक आहे. शाडूच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत असल्याने अशा मूर्ती बनविण्याकडे भाविकांचाही कल आता वाढत चालला आहे. शासनाने सहकार्य केल्यास, काही नियम, अटी घातल्यास तसेच योग्य अनुदान लागू केल्यास केवळ शाडू मातीच्याच मूर्ती तयार करण्यास मूर्तिकारांनाही अडचण येणार नाही.