(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड- जाकादेवी येथील रहिवाशी तसेच मालगुंड शिक्षण संस्थेच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयातील माजी शिक्षिका श्रीम. उषा प्रभाकर राणे यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी रविवार दि.३१ जुलै रोजी दु.३ वा. मालगुंड येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
दिवंगत उषा प्रभाकर राणे यांना तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयातील उत्कृष्ट शिक्षिका म्हणून ओळखले जात.भाषा व इतर विषयांचे त्यांनी अतिशय तळमळीने अध्यापन केले होते. भारत स्काऊट गाईड चळवळीतही त्यांनी आपले पती कै.प्रभाकर राणे यांच्या साथीने त्यांनी त्यावेळी उल्लेखनीय कामगिरी केली होती. स्काऊट गाईडच्या उपक्रमशीलतेबद्दल त्यांना दीर्घ सेवा पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई ,नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल जाकादेवी-मालगुंड परिसरातून दुःख व्यक्त होत आहे. कै.उषा प्रभाकर राणे यांना मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी, मालगुंड व काजुर्ली विद्यालयातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.